Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन वजनदार मंत्रीपदे निश्‍चीत : अजून एकाला लॉटरीची शक्यता

जळगाव- जितेंद्र कोतवाल, लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | लवकरच अस्तित्वात येणार्‍या फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांना वजनदार मंत्रीपदे मिळणार असल्याचे निश्‍चीत असून याच्या जोडीला एकाला राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता देखील आहे.

आज रात्री पावणेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर येत्या दोन दिवसात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोन्ही मान्यवर अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, नवीन मंत्रीमंडळात भारतीय जनता पक्षातर्फे माजी मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. गिरीश महाजन यांना चांगले खाते मिळणार असल्याचे मानले जात आहे. महाजन यांना महसूल, जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण आदीपैकी कोणतेही एक खाते मिळू शकते अशी चर्चा आहे. ठाकरे यांच्या सरकारमध्ये असणारे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा व स्वच्छता या खात्यापेक्षा बढती मिळण्याची शक्यता आहे. त्यांना परिवहन वा कृषी खाते मिळण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे.

यासोबत जिल्ह्याच्या वाट्याला एक राज्यमंत्रीपद येऊ शकते. एकनाथ शिंदे यांच्या गटाचा विचार केला असता चिमणराव पाटील, किशोरआप्पा पाटील वा चंद्रकांत पाटील यांच्या नावाची यासाठी चर्चा सुरू आहे. तर महिला म्हणून लताताई सोनवणे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. भारतीय जनता पक्षातर्फे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे हे राज्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. यासोबत माजी पालकमंत्री संजय सावकारे यांचा देखील क्लेम मानला जात आहे. अर्थात, यातून कुणाला तरी लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

Exit mobile version