Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईत दोन लोकल ट्रेनची धडक टळली ?

Mumbai local train

नवी मुंबई, वृत्तसंस्था | सीबीडी बेलापूर स्थानकाजवळ लोकलचा मोठा अपघात टळला असल्याची चर्चा सुरू आहे. बेलापूरहून सीएसएमटीकडे निघालेली लोकल आणि सीएसएमटी स्थानकाहून बेलापूरच्या दिशेने येणारी लोकल एकमेकांसमोर आल्या. या दोन्ही लोकलची धडक थोडक्यात टळली. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने हे वृत्त फेटाळून लावले आहे.

 

आज, सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. क्रॉस ओव्हर पॉईंटजवळ तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे.

मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. बेलापूर येथील प्लॅटफॉर्मवर क्रमांक एकजवळील पनवेल एन्डजवळ रेल्वे रुळाला तडे गेले होते. त्यामुळे त्या प्लॅटफॉर्मवर येणारी लोकल आधीच थांबवून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर वळवण्यात आली. त्यावेळी या लोकलच्या मागे असणारी लोकल अचानक थांबवण्यात आली. या लोकल समोरासमोर नसून एकामागोमाग एक असल्याचे स्पष्टीकरण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी एका वृत्तवाहिनीला दिली. या मार्गावर ४.३० ते ५.०० वाजण्याच्या दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे साहजिकच रेल्वेच्या रांगा लागल्या. त्यामुळे लोकांना पाहताना दोन विरुद्ध दिशेच्या लोकल समोरासमोर आल्यासारखे वाटले असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, एम-इंडिकेटर या अॅपवर प्रवाशांनी चॅटमध्ये दोन्ही लोकल समोरासमोर आल्याचे म्हटले आहे. या दोन्ही लोकल समोरासमोर आल्यामुळे प्रवाशांना लोकलमधून उतरून चालत बेलापूर स्थानक गाठावे लागले असल्याची माहितीही प्रवाशांनी दिली आहे.

Exit mobile version