Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व‍िद्यापीठामार्फत ‘उष्मालाट पूर्वतयारी व सौम्यीकरण व्यवस्थापन’ या व‍िषयावर दोन द‍िवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व‍िकस‍ित देशांमध्ये कोणत्याही नैसर्ग‍िक आपत्तीची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान आहे. यामुळे तेथील नागर‍िक, शेतकरी यांना नैसर्ग‍िक संकटांपासून सतर्क करता येते. त्यातून आर्थ‍िक व जीवीत हानी ही टाळता येते. यादृष्टीने तंत्रज्ञानाची कास धरत महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन व‍िभागाचे स्वत:चे सॅटेलाईट असावे. यासाठी मदत व पुनर्वसन व‍िभाग प्रयत्न करत आहे. अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे द‍िली. कव‍‍य‍ित्री बह‍िणाबाई उत्तर महाराष्ट्र व‍िद्यापीठात महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन, संशोधन आण‍ि प्रश‍िक्षण संस्था स्थापन करण्याच्या प्रस्तावाचा शासन सकारात्मक व‍िचार करेल. अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी द‍िली.

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव जिल्हा प्रशासन आणि कवयित्री बह‍िणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र व‍िद्यापीठामार्फत ‘उष्मालाट पूर्वतयारी व सौम्यीकरण व्यवस्थापन’ या व‍िषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सिनेट सभागृहात होणाऱ्या या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी व्यासपीठावर कव‍िय‍त्री बह‍िणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र व‍िद्यापीठाचे कुलगुरू डॉ.महेश्वरी, आपत्ती व्यवस्थापन व‍िभागाचे संचालक आप्पासो धुळाज, ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद उपस्थ‍ित होते. या कार्यशाळेत अपर मुख्य सच‍िव सुजाता सौन‍िक, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन व‍िभागाच्या प्रधान सचिव डॉ.सोन‍िया सेठी मंत्रालयातून ऑनलाईन उपस्थिती होत्या.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही भाग उष्णतेच्या लाटेने होरपळत असतो. शेतकरी, शाळकरी मुले व रस्त्यावरील विक्रेते यांना उन्हाच्या लाटेचा थेट सामना करावा लागतो. कार्यशाळेचे माध्यमातून अधिकाऱ्यांनी स्वतःची कल्पकता व सूचनांची मांडणी करावी. निर्णयापर्यंत जाण्यासाठी अनुभवांचे आदान-प्रदान झाले पाहिजे. उष्मा लाट का येते , कशी येते याची कार्यशाळेत कारणांमिमासा झाली पाहिजे. जनजागृतीच्या माध्यमातून मृत्यू दर कमी करता येईल.

शेती व रोजगाराचे उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण व्हावे यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. मृत्यू दर कमी कसा होईल यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांचे संरक्षण झाले पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करत आहे. असे ही त्यांनी यावेळी सांग‍ितले.

कुलगुरू श्री.माहेश्वरी म्हणाले की, हवामान बदल, जलवायू परिवर्तनाची समस्या जगात उद्भवत आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राज्यशासनाच्या वतीने राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

श्रीमती सौनिक म्हणाल्या की, उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक व प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. जिल्ह्यातील हवामानाचे बदल प्रशासनाने समजून घेतले पाहिजे. उष्णतेच्या लाटेबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून आलेल्या सूचनांचा राज्यस्तरीय कृती आराखड्यात समावेश केला जाईल.

श्रीमती सेठी म्हणाल्या की, राज्यातील २२ जिल्ह्यात उष्मा लाटेचा उन्हाळ्यात प्रभाव असतो. आपले उद्दिष्ट शून्य मृत्यू हे धोरणावर काम करणे आवश्यक आहे. उन्हापासून संरक्षणाच्या दृष्टीने तयार करायच्या व्यवस्थापनासाठी यंत्रणांनी सुसज्ज असणे आवश्यक आहे. अल्पकालीन उद्दिष्ट न ठेवता आपण दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून काम केले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष येत्या काही दिवसात अद्यावत करण्यात येणार आहेत. राज्य व जिल्हा पातळीवर यंत्रणांमध्ये समन्वय ठेवत कार्यक्षमता वाढविण्यासाठी काम करण्यात येईल.‌

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, अतिशय महत्त्वाच्या विषयावर चिंतन होणार आहे. उत्तर महाराष्ट्र व विदर्भात उष्णतेचे प्रमाण अधिक असते. उष्णतेचे क्षमन व्हावे. उन्हा पासून नागरिकांचा बचाव कसा करता येईल. या विषयी या कार्यशाळेच्या माध्यमातून धोरण ठरणार आहे.
यावेळी उपस्थ‍ित मान्यवरांच्या हस्ते उष्णतेच्या लाटेच्या कृती आराखड्याचे अनावरण करण्यात आले. आभार आप्पासो धुळाज यांनी मानले.

उद्घाटन सत्रानंतर मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रांचे उप महासंचालक सुन‍िल कांबळे यांचे ‘उष्णतेच्या लाटे संदर्भातील – व्याख्या, पर‍िभाष, पूर्व सुचना निकष, पुर्व सूचना प्रणाली आण‍ि २०२४ साठीचे पुर्वानुमान ‘ या व‍िषयावर व्याख्यान झाले. युन‍िसेफचे प्रकल्प अध‍िकारी अनिल घोडके यांचे ‘मध्य भारतामध्ये क्लामेट स्मार्ट इन्स्ट‍िट्यूशन चा वापर करून उष्मा लाटेचे सौम्यीकरण आणि अत्यावश्यक सेवा या व‍िषयावर ‘ व्याख्यान झाले. राज्य हवामान कृती कक्ष आण‍ि पर्यावरण व वातावरीणीय बदलाचे संचालक अभ‍िज‍ित घोरपडे यांचे ‘राज्य हवामान कृती आराखडा आण‍ि विभाागाच्या इतर योजना ‘या विषयावर व्याख्यान झाले. गांधीनगरच्या इंड‍ियन इन्स्ट‍िट्यूट ऑफ पब्ल‍िक हेल्थचे प्राध्यापक डॉ.महावीर गोलेच्छा यांचे ‘उष्णता लाटेच्या कृती आराखडा तयार करणे तसेच संबंध‍ित व‍िभागाने घ्यावयाच्या प्रमुख कृती’ याव‍िषयावर ऑनलाईन व्याख्यान झाले. सार्वजन‍िक आरोग्य व‍िभागाच्या डॉ.योगश्री सोनवणे यांचे ‘उष्णतेच्या लाटेच्या कृतीसाठी तयारी, आव्हाने आणि पुढील मार्ग- सार्वजनिक आरोग्य व‍िभाग’या व‍िषयावर व्याख्यान झाले.

९ फेब्रुवारी रोजी उष्णतेची लाट आणि शेती या व‍िषयावर कृषी व‍िभागाचे सेवान‍िवृत्त प्रकल्प अध‍िकारी अन‍िल भोकरे यांचे व्याख्यान होणार आहे. नागपूरचे सेवान‍िवृत्त ज‍िल्हा आरोग्य अध‍िकारी डॉ.नंदक‍िशोर राठी यांचे ‘उष्णतेच्या लाटेचा कृती आराखडा आणि त्याची अंमलबजावणी’ या व‍िषयावर व्याख्यान होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन व‍िभागाचे संचालक आप्पासो धुळाज यांचे ‘राज्य उष्णतेच्या लाटेचा कृती आराखड्यातील आढावा आण‍ि पुढील वाटचाल’ याव‍िषयावर व्याख्यान होणार आहे.

या कार्यशाळेला राज्यातील सर्व न‍िवासी उपजिल्हाध‍िकारी, ज‍िल्हा आपत्ती व्यवस्थापन अध‍िकारी, महानगरपाल‍िका-नगरपाल‍िकेचे अध‍िकारी, कृषी , आरोग्य व‍िभागाचे अध‍िकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रत‍िनिधी, आपदा म‍ित्र उपस्थ‍ित आहेत.

Exit mobile version