Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोधडी शिवणार्‍यांचे नशीब कोरोनाने विस्कटले ! : आजीनंतर वडिलांचाही मृत्यू; नातू पोरका

पहूर, ता. जामनेर रवींद्र लाठे । कोरोनामुळे अनेकांच्या आयुष्यात किती भीषण दु:ख कोसळत आहे याची प्रचिती येथील एका घटनेतून आली आहे. एका मुलाच्या आजीनंतर वडिलांचाही कोरोनाने मृत्यू झाल्याने त्याने केलेला हृदयद्रावक आक्रोश पहूरकरांच्या काळजाचे पाणी..पाणी करून गेला. गोधडी विक्री करून गुजराण करणार्‍या या कुटुंबाचे आयुष्य कोरोनाने विस्कटून टाकल्याचे दिसून आले आहे.

पहूर – कसबे येथील लेलेनगर भागात राहणार्‍या ५० वर्षीय गृहस्थाचा गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास जळगाव येथील कोवीड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर जळगाव शहरात शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मोलमजुरी करून तसेच कधी मिस्तरीच्या हाताखाली बांधकामावर…तर कधी फवारणीसाठी दुसर्‍याच्या शेतावर … अशा प्रकारे हाताला मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होते. एकीकडे त्यांच्यावर उपचार सुरू असतांनाच त्यांच्या वयोवृद्ध आईचा पाय फॅक्चर झाल्याने पायावरील उपचार सुरू असतानाच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना जळगाव येथे कोवीड रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान त्यांच्या कुटुंबातील इतरांचेही स्वॅब घेण्यात आले. त्यात वृद्धेचा मोठा मुलगा बाधीत आढळल्याने त्यांनाही जळगावला उपचारार्थ दाखल करण्यात आले. आई आणि मुलावर उपचार सुरू असताना दि . ६ ऑगष्ट २०२० रोजी रात्री ११.३० वाजता कोवीड रुग्णालयातून डॉक्टरांचा त्यांच्या मुलाला फोन आला … ”बाळा तुझे वडील तुला सोडून गेले… सकाळी अंत्यसंस्कार करण्यासाठी जळगावला येऊन जा. स्वतःला सावरा” असा धीर देत डॉक्टरांनी फोन बंद केला. प्रशासनाच्या नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार झाले.

वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन घरी आल्यावर पुन्हा शुक्रवारी रात्री साधारण अकराच्या सुमारास डॉक्टरांचा फोन आला, ”बाळा तुझ्या आजींची तब्येत थोडी सिरीयस आहे. सकाळी भेटायला येऊन जा” मात्र सकाळ व्हायच्या आतच पुन्हा रात्री १ वाजेच्या सुमारास तोच आवाज ऐकायला आला …”बाळा तुझी आजी तुम्हाला सोडून निघून गेली…सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तुम्ही या!” यानंतर या मुलाने भरल्या डोळ्यांनी आजीवरही जळगांव येथेच अंत्यसंस्कार केले. वडिल आणि आजी ही घरातील कमावती मंडळी निघून गेल्याने ”आता आम्ही करावे तरी काय ?” असे म्हणून हुंदके देणारा हा मुलगा पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.

आयुष्यभर गोधड्या शिवून पोटाची खळगी भरणार्‍या आजीचाही वडीलांपाठोपाठ एक दिवसाच्या अंतराने मृत्यू झाला. दुःखाचा डोंगर कोसळुन घडलेल्या या हृद्यद्रावक घटनेने पहूर येथे हळहळ व्यक्त होत आहे. या गरीब कुटुंबावर आज दु:खाचा डोंगर कोसळला असुन त्यांना धीर देणे अत्यंत गरजेचे आहे.

Exit mobile version