Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरफोडीतील दोन संशयित आरोपी जेरबंद; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । मेहरूण मधील गणेश नगरात सेवानिवृत्त शिक्षकाचे बंद घरफोडून ६४ हजाराची रोकड लांबविणाऱ्या तीन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

मोहनसिंग जगदीशसिंग बावरी वय २०, फरीद उर्फ गुल्ली मोहम्मद मुलतानी वय १९ दोन्ही रा. तांबापुरा या संशयितांसह एका अल्पवयीन मुलगा असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.  याती मोहनसिंग हा सराईत गुन्हेगार असून बलात्काराच्या गुन्ह्यात जामीनावर सुटल्यावर त्याने ही घरफोडी केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनूस शेख हे मेहरुणमधील गणेश नगरात पत्नी सायरा बानो खान यांच्यासह वास्तव्याला आहेत. मुलगा रिजवान ठाणे येथे वास्तव्याला असल्याने १२ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घराला कुलूप लावून दाम्पत्य ठाण्याकडे रवाना झाले. गुरुवार २९ जुलै रोजी सकाळी साडे सहा वाजता ते घरी आले असता घराच्या कंपाऊंडला कुलूप लावलेले होते. ते उघडल्यावर आतमध्ये गेले असता मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी तुटलेली होती. घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते. कपाटातील ड्रावर पलंगावर ठेवले होते. त्यातील ४० हजार रुपये रोख, १२ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मीनी चैनल पेंडल, सहा हजार रुपये किमतीच्या ५ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, ५ ग्रॅमच अंगठी असा ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे समोर आले होते. घरात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर खान यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. घरफोडीतील संशयित मोहनसिंग याने त्याचे साथीदारांच्या मदतीने बलात्काराच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटून आल्यानंतर दुसर्‍या दिवशी सदरची घरफोडी केली होती.

त्याबाबत पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना माहिती मिळाल्यावर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, सुधीर साळवे, साईनाथ मुंडे यांच्या पथकाने संशयित मोहनसिंग, फरीद याच्यासह १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. संशयित मोहनसिंग याच्यावर घरफोडीचे बरेच गुन्हे दाखल असून त्याचे संपूर्ण भावाविरुद्ध सुद्धा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. दोघांना आज न्यायालयात हजर केल असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  पुढील तपास  सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

 

Exit mobile version