Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपीना गुजरातमधून अटक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर १४ एप्रिल रोजी रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. मुंबई क्राईम ब्रांचच्या टीमने या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या गुजरातमधून आवळल्या आहेत. ४८ तासांच्या अर्थात दोन दिवसांच्या आतच पोलिसांनी त्यांना भुज येथून अटक केली. त्यांना आज मुंबईत आणण्यात आले आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या दोन्ही आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून २५ एप्रिलपर्यंत ते पोलिस कोठडीत असतील.

पोलिसांनी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सागर पाल आणि विकी गुप्ता अशी दोन आरोपींची नावे असून सागर पाल याने हा गोळीबार केला होता. दोन्ही आरोपींना कोर्टासमोर सादर करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेऊन महत्वाचे खुलासे केले. गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तांनी यासंदर्भात बरीच माहिती दिली.

सलमानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपींची नावं सागर पाल आणि विकी गुप्ता अशी असून सागर पाल याने गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. तो मूळचा बिहारचा असून दोन वर्ष हरियाणामध्ये काम करत होता. हरियाणात असतानाच तो बिश्नोई गँगच्या संपर्कात आला अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या काही काळापासून दोन्ही आरोपी पनवेलमधल्या घरात राहत होते, तेथे राहण्यासाठी त्यांनी रूम डिपॉझिट म्हणून 10 हजार रुपये आणि 3500 रुपये हे रूम भाडे दिले होते.

१४ एप्रिलला पहाटे अभिनेता सलमान खान यांच्या घरी झालेल्या गोळीबाराप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच दिवशी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. या प्रकरणात १२० बी कलम वाढवण्यात आलं. सलमानच्या घरी गोळीबार करताना आरोपींनी 5 राउंड फायर केले होते, त्यापैकी एक गोळी गॅलेक्सीच्या बाल्कनीमध्येही गेली होती. बाईकवर आलेल्या दोघांनी हा गोळीबार केला. त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची १२ पथके तैनात करण्यात आली होती. तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींची मिळवण्यात आली. तेव्हा ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली.

१४ एप्रिल रविवारी पहाटे ५ च्या सुमारास सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तातडीने पावले उचलली. गोळीबार करुन गुजरामधील भुज जिल्ह्यात आरोपी पळाले होते. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही आरोपी हे बिहारमधील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तातडीने पावले उचलली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तपासासाठी २० पथके तयार केली होती. पोलीस तपासातून नवनवीन खुलासे समोर येत होते. दोन्ही आरोपींनी सलमान खानच्या घरावर चार ते पाच गोळ्या झाडल्या होत्या.

याप्रकरणी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे नावही आरोपी म्हणून नोंदवण्यात आले आहे. गोळीबारानंतर अनमोल बिश्नोईने फेसबुकवर पोस्ट करुन गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याने त्याला आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं. बिश्नोई गँगशी सबंधित ज्या ज्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तिथे आम्ही चौकशी करत आहोत माहिती घेत आहोत आणि त्या तपासयत्रणांच्या संपर्कात राहून तपास करत आहोत, असे पोलिसांनी सांगितलं.

Exit mobile version