Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिन्या जगताप खून प्रकरणातील फरार दोघा संशयितांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याच्या कारागृह प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या २०२० सालच्या जळगाव जिल्हा कारागृहातील चिन्या उर्फ रविंद्र जगताप हत्याकांडाच्या गुन्ह्यातील संशयितांपैकी फरार असलेले आण्णा किसन काकड (वय ५३, पानेवाडी, मनमाड), अरविंद प्रकाश पाटील (वय ३८, रा. चाळीसगाव) यांना अखेर दोन वर्षांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता अटक केली आहे. दोघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ११ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा कारागृहात संशयितांनी केलेल्या जबर मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता . कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांनी मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत चिन्या जगताप यांची पत्नी मीना जगताप यांनी केले होते. त्यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि नशिराबादच्या पोलीस निरीक्षकांना गुन्हा नोंदवावा म्हणून निवेदन दिले होते. त्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्यात तत्कालीन कारागृह अधीक्षकांसह ४ कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

 

कारागृह कायद्यानुसार ही घटना गंभीर असून पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यांनंतरच्या ४८ तासांच्या आत या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र तसे झाले नाही. आता १४ महिन्यांनी  गुन्हा दाखल झाला होता. तर पेट्रस गायकवाड याचे निलंबन झालेले आहे. त्यानुसार आता दाखल गुन्ह्यात फरार आण्णा किसन काकड (वय ५३, पानेवाडी, मनमाड), अरविंद प्रकाश पाटील (वय ३८, रा. चाळीसगाव) यांना गुरूवारी १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता अटक करण्यात आली आहे. त्यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य संशयित आरोपी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी हे अद्यापही फरार आहेत. तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल करीत आहे.

 

Exit mobile version