Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी ट्रम्प पुन्हा घोड्यावर

106806587 gettyimages 1146754182

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. जर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश तयार असतील तर आपण मध्यस्थी करू, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. दरम्यान, “भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपल्या भविष्यासाठी उपयुक्त अशी पावले उचलावी. मला आशा आहे की, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश मिळून काश्मीरचा प्रश्न सोडवतील. प्रत्येक समस्येचे समाधान हे असतेच” असेही त्यांनी नमूद केले.

 

 

“भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी मिळून काश्मीरप्रश्नी तोडगा काढावा. दोन्ही देशांनी फायदेशीर मार्ग पाहून काश्मीरचा प्रश्न सोडवावा. प्रत्येक समस्येचं समाधान हे असतंच, असं ट्रम्प यावेळी म्हणाले. काश्मीरचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जर शक्य असेल तर मी मदत करण्यास तयार आहे. दोन्ही देशांची इच्छा असेल तर आपण या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास तयार आहोत,”असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताची कोंडी करण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु प्रत्येक वेळी पाकिस्तानच तोंडावर पडल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय समुदायाने या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली. तसेच काश्मीरप्रश्नी तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

चर्चेदरम्यान, ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्यासमोर ह्यूस्टनमधील हाउडी मोदी या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचाही उल्लेख केला. “मी काल एक आक्रमक वक्तव्य ऐकलं आणि मला भारताच्या पंतप्रधानांकडून असं वक्तव्य ऐकायला मिळेल, असं वाटलं नव्हतं. परंतु त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ५९ हजार प्रेक्षकांनी त्यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला,”असेही ट्रम्प म्हणाले. ह्युस्टन येथील रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक लढाईचे आव्हान केले होते. तसेच त्यांनी पाकिस्तानवरही निशाणा साधला होता. भारताने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर ज्यांना आपला देश सांभाळता येत नाही अशा लोकांना त्यांचा त्रास झाला. दहशतवादाला थारा देणाऱ्या आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांविरोधात निर्णायल लढाईची वेळ आली असल्याचे मोदी म्हणाले होते.

काश्मीरचा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे, असा दावा इम्रान खान यांनी ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान केला. यावेळी पाकिस्तानच्या एका पत्रकाराने काश्मीरमधील परिस्थिती वाईट असल्याचं सांगत मानवाधिकाराबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ट्रम्प यांनी इम्रान खान यांना टोला लगावत तुम्ही असे पत्रकार कुठून शोधून आणता? असा सवाल केला.

Exit mobile version