Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यशस्वी डॉक्टर होण्यासाठी त्रिसूत्री आवश्यक – मुकुल चिमोटे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उत्तम आणि यशस्वी डॉक्टर होण्यासाठी जागतिक दृष्टीकोन, आर्थिक व्यवस्थापन आणि ध्येय ही त्रिसूत्री आवश्यक असल्याचा कानमंत्र अ‍ॅस्ट्युट अ‍ॅकॅडमीचे मुकुल चिमोटे यांनी विद्यार्थ्यांना दिला. दरम्यान कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी दिलेले योगदान याविषयी त्यांनी गौरवोद्गार व्यक्त केले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्लानिंग फॉर इंडीयन एमबीबीएस स्टुडंट टु बिकम ग्लोबल फिजीशियन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. माया आर्विकर, डॉ. दिलीप ढेकळे, अ‍ॅस्ट्युट अ‍ॅकॅडमीचे मुकुल चिमोटे, डॉ. कैलास वाघ, प्रशांत गुडेट्टी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करण्यात आले. मुकुल चिमोटे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतांना तुम्ही इथे काही स्वप्ने घेऊन आला आहात. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नियोजन गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्राच्यादृष्टीने आपल्या देशात प्रचंड बुध्दीमत्ता आहे. मात्र जग झपाट्याने बदलत आहे. विदेशी कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत आहे.

त्यामुळे आपल्यालाही अधिक स्मार्ट व्हावे लागणार आहे. त्यासाठी अधिकाधिक संशोधन करणे आवश्यक आहे. वैद्यकीय पेशात फक्त पैसा महत्वाचा नसून तुमचे योगदान आणि कार्य हे अधिक महत्वाचे आहे. प्रत्येकाची स्वप्ने मोठी आहेत. ती पूर्ण करण्यासाठी आणि यशस्वी डॉक्टर होण्यासाठी जागतिक दृष्टीकोन, आर्थिक व्यवस्थापन आणि ध्येय ह्या त्रिसुत्रीची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचेही मुकुल चिमोटे यांनी सांगितले. यावेळी वैशाली जाधव, डॉ. वर्षा चिमोटे ह्या उपस्थित होत्या. कार्यशाळेचे सूत्रसंचालन सानिका कोकणे हिने केले.

Exit mobile version