Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गाडऱ्या या अतिदुर्गम क्षेत्रात रुग्णसेवा व रूग्णवाहीकेअभावी आदीवासींचे जीव धोक्यात तक्रार

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील तालुक्याला लागून असलेल्या सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम अशा क्षेत्रातील गाडऱ्या या गावातील एका आदीवासी तरुणीचा विषारी सापाने दंश केल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली असून आमदार शिरीष चौधरी यांनी यावल ग्रामीण रुग्णालयाला भेट देत मयत तरुणीच्या कुंटुबाचे सांत्वन केले.

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या दुर्गम भागातील गाडऱ्या गावातील २३ वर्षीय अविवाहीत आदीवासी तरूणी फुगली भाया बारेला हिचा आपल्या शेतात काम करीत असतांना अचानक तिला विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाला. या ठिकाणी जर तिला तात्काळ सर्पदंश प्रतिबंधक लस मिळाली असती तर कदाचीत ती वाचली असती अशी खंत गावऱ्यांनी व्यक्त केली.

मयत तरुणीचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात एका खाजगी चारचाकी वाहनाने आणण्यात आला.

घटनेचे वृत्त कळताच रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन मयत तरूणीच्या कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी रुग्णालयात आमदार शिरीष चौधरी यांच्याशी बोलतांना आदीवासी तरूणांनी व नागरीकांनी गंभीर स्वरूपाच्या रूग्णासाठी रुग्णवाहीका मिळत नसल्याने अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागत असल्याचे सांगितले.

ज्या मानसेवी आरोग्य अधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती केली आहे. ते या गावात व परिसरात कधी ही दिसून येत नसल्याच्या तक्रारी व आरोग्य बाबतच्या समस्या व अडचणींचा पाढाच यावेळी आदीवासी बांधवांनी वाचला. या सर्व तक्रारीची दखल घेत आमदार शिरीष चौधरी यांनी लागलीच मोबाइलव्दारे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांच्याकडे या आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांविषयी तक्रारी असल्याचे नमुद करून याविषयी आपण लक्ष घालण्यासंदर्भात चर्चा केली.

अशाप्रकारे जर नियुक्तीच्या ठिकाणी जर कुणी जात नसेल तर त्यांच्या कारवाही करणे गरजेचे आहे अशा सुचना त्यांनी दोघं आधिकाऱ्यांना दिल्यात. तर कृषी विज्ञान केंद्र प्रमुखांशी बोलणी करून एक रुग्णवाहीकाही उपलब्ध करून देण्याविषयी त्यांनी चर्चा केली.

अशा अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदीवासी बांधवांच्या गावांसाठी प्रसंगी स्वतंत्र रुग्णवाहीका असावी यासाठी तात्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी अशा सुचना दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर पाटील, गाडऱ्या जामन्या या गावाचे सरपंच भरत छतरसिंग बारेला व ग्रामसेवक रूबाब तडवी, वढोदे गावाच्या सरपंच संदीप सोनवणे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे नानासाहेब घोडके व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version