Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रेल्वे प्रवाशावर उपचार

जळगाव प्रतिनिधी । झाशी येथील आपल्या बहिणीच्या लग्नासाठी जाणाऱ्‍या एका प्रवाशाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती जळगाव रेल्वे पोलिसांना मिळताच त्याला जळगाव रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आले असून त्याला महानगरपालिका कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कर्नाटकमधील हा युवक बहिणीच्या लग्नासाठी झाशी येथे जाण्यासाठी यशवंतपूर रेल्वे स्थानकावरुन येथून गाडी क्रमांक ०६५२३ यशवंतपूर-दिल्ली एक्सप्रेसने एस १ बोगीतील ५९ क्रमांकाच्या सीटवरुन प्रवास करीत होता. प्रवास करण्यापूर्वी रेल्वे स्थानकावर कोविड तपासणी करण्यासाठी त्याचे नमुने घेण्यात आले होते. काही तासानंतर या युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजले. रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून हा मॅसेज रेल्वेच्या लोकेशननुसार जळगाव स्थानकातील रेल्वे पोलिसांना मिळाला. 

 रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल नगराळे यांनी तात्काळ स्वप्निल महाले, अनिल नायडू यांना त्या पॉझिटिव्ह प्रवाशाबाबत माहिती दिली. सायंकाळी ७.०५ वाजेच्या सुमारास यशवंतपूर-दिल्ली एक्सप्रेस जळगाव स्थानकावर आली. येथे प्रवास करीत असलेल्या संबंधित  पॉझिटिव्ह प्रवाशाला रेल्वेतून खाली उतरविण्यात आले.

प्रवाशाला रेल्वेतून उतरवून त्याला तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर  सफाई कर्मचारी योगेश  फरकांडे व हितेंद्र चांगरे यांनी तो प्रवासी बसलेल्या सीटसह ती संपूर्ण बोगी सॅनिटाईज केली. त्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ करण्यात आली. त्या पॉझिटिव्ह रुग्णास महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Exit mobile version