पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर राजघराण्याचाच अधिकार- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली । जवळपास दोन लाख कोटी रूपयांची संपत्ती असणार्‍या केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरावर व्यवस्थापन करण्याचा अधिकार त्रावणकोर राजघराण्याचाच असेल असा महत्वाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

श्री पद्मनाभस्वामी मंदिरासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्रावणकोरच्या राजघराण्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुअनंतपुरम जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती यापुढे मंदिराची व्यवस्था पाहणार असल्याचेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

२०११मध्ये केरळ उच्च न्यायालयाने पद्मनाभस्वामी मंदिराच्या हक्क आणि संपत्तीबाबत मोठा निर्णय देताना राज्य सरकारला अधिकार दिले होते. केरळ हायकोर्टाच्या या आदेशास त्रावणकोर राजघराण्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात ८ वर्षांहून अधिक काळ सुनावणी सुरू होती. एप्रिलमध्ये या प्रकरणातील झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती ललित आणि न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय राखून ठेवला. अखेर सर्वोच्च न्यायालयानं केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळत श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्रावणकोर घराण्याला दिली आहे.

Protected Content