Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एसएनडीटी महाविद्यालयात ‘व्ही-स्कुल ॲप’चे मुख्याध्यापकांसाठी प्रशिक्षण शिबीर

जळगाव प्रतिनिधी । व्होवेल्स ऑफ पीपल असोसिएशन तसेच जळगाव जिल्हा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व मराठी, सेमी तसेच उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी व्ही स्कुल ॲप नव्याने तयार करण्यात आला असून जिल्ह्यातील शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी ॲपचे प्रशिक्षण आज घेण्यात आले.

सदर प्रशिक्षणात जळगाव शहरातील सर्व मराठी, सेमी तसेच उर्दू माध्यमाचे मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुख उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार व शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले.

व्ही स्कुल अँप हे सर्वांसाठी मोफत असून मराठी माध्यमासोबतच उर्दू माध्यमाचा विचार करून तयार केलेले हे पहिलेच ॲप आहे. व्हिडीओ, पीपीटी, ऑडिओ, चित्रे, जी.आय.एफ, टेक्स्ट अशा विविध प्रकारच्या माध्यमात या ॲपमध्ये माहिती दिलेली असून हे अप्लिकेशन इंटरनेट विना सुद्धा विद्यार्थी वापरू शकण्याची सुविधा यात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता एकूण 1,37,046 इतक्या विद्यार्थ्यांनी हे अप्लिकेशन डाउनलोड केलेले असून याच्या माध्यमातून ते शिक्षण घेत आहेत. कोरोना सारख्या काळामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारात विद्यार्थी अध्ययन करू शकतील, या उद्दिष्टाने सदर अप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणात अप्लिकेशनचा प्रत्यक्ष वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण मुख्याध्यापकांना या वेळी देण्यात आले. त्यानंतर सदर प्रशिक्षण इतर शिक्षक तसेच पालक यांच्यासाठी आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रशिक्षणाचे पीपीटी प्रदर्शन नवमान व शाहिद यांनी केले.

कार्यक्रमात स्वागतगीत पवार मॅडम यांनी सादर केले तर प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अट्रावलकर यांनी केले तर आभार सोनल यादव यांनी मानले. तसेच सुनील सरोदे, योगेश भालेराव आणि मनोज भालेराव यांनी सहकार्य केले.

Exit mobile version