Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरद पवार जळगाव जिल्ह्यात फुंकणार रणशिंग !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या राज्यव्यापी दौर्‍यात जळगाव जिल्ह्यात सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी आपण राज्यभरात दौरे करून पक्षाशी बेईमानी करणार्‍यांच्या विरोधात हल्लाबोल करणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर त्यांनी काल माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील समाधीवर जाऊन अभिवादन केले. यानंतर त्यांनी राज्यव्यापी दौर्‍याचा प्रारंभ करणार असल्याचे सूतोवाच केले.

दरम्यान, शरद पवार हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. १० जुलै रोजी ते जिल्हा दौर्‍यावर येणार असून याचे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने आमदार एकनाथराव खडसे आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पवार साहेबांचा दौरा निश्‍चीत असल्याचे सांगितले. मात्र या दौर्‍यात एका ठिकाणी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव वा मुक्ताईनगर यापैकी एका ठिकाणी शरद पवार यांची सभा होण्याची शक्यता आहे.

आमदार खडसे आणि जिल्ह्यातील मान्यवर नेते उद्या अर्थात ५ जुलै रोजी शरद पवार यांची भेट घेणार आहेत. याच भेटीत त्यांच्या आगामी दौर्‍याबाबत निश्‍चीती होणार आहे. मात्र त्यांचा जळगाव दौरा निश्‍चीत झाल्याचे मानले जात आहे. याच दौर्‍यात ते जळगाव जिल्ह्यात पक्षासाठी रणशिंग फुंकणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version