Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अयोध्या परिक्रमेच्या मार्गावर पूर्णपणे मद्य बंदी !

अयोध्या-वृत्तसंस्था | उत्तरप्रदेश सरकारने अयोध्येसह अयोध्या परिक्रमेतील ८४ किलामीटरच्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे मद्यबंदी करण्याची घोषणा केली आहे.

अयोध्येतील ८४ कोसी या परिक्रमा मार्गावरील सर्व दारूची दुकाने आता बंद होणार आहेत.  उत्तर प्रदेशचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री नितीन अग्रवाल यांनी श्री राम मंदिर ट्रस्ट क्षेत्राचे महासचिव चंपत राय यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अयोध्येतील ८४ कोसी परिक्रमा मार्ग निषिद्ध क्षेत्र घोषित केला जाईल. या रोडवर असलेली दारूची दुकाने हटवली जातील.

अयोध्येसोबतच फैजाबाद, बस्ती, आंबेडकर नगर, सुलतानपूर या भागांचाही श्री रामजन्मभूमीच्या ८४ कोसी परिक्रमा मार्गात समावेश करण्यात येणार आहे. जिथे परिक्रमा मार्गावर दारूचे दुकान नसेल. आधीच असलेली सर्व दुकाने काढून टाकली जातील. परिक्रमा परिसरात मद्यविक्रीला पूर्णपणे बंदी असेल.

उत्तर प्रदेशचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री नितीन अग्रवाल राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना भेटण्यासाठी आले होते. बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, श्री राम मंदिर परिसर यापूर्वीच दारूमुक्त करण्यात आला आहे. आता ८४ कोस परिक्रमा मार्गावरून दारूची दुकानेही हटवण्यात येणार आहेत. याबाबत उत्पादन शुल्क विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान,  २२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. अशा परिस्थितीत आज यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्या दौर्‍यावर आहेत. येथे ते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीचा आणि ३० जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या आगमनाचा आढावा घेतील.

Exit mobile version