Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; नदी नाल्यांना पूर

बुलडाणा प्रतिनिधी । गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात दमदार, तर कुठे मध्यम, कुठे तुरळक अशा स्वरूपात वरूण राजा हजेरी लावत आहे. मात्र काल रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पावसाचे धुमशान जिल्ह्यात दिसून येत आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी घुसले आहे. तर काही नागरिकांच्या घरातही पावसाचे पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील वान, पुर्णा, नळगंगा, पैनगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा, खडकपूर्णा आदी नद्यांना पूर आला आहे.

जिल्ह्यात खामगांव तालुक्यात सर्वात जास्त 55.3 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 26 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. तसेच आतापर्यत सर्वसाधारण पर्जन्यमानाशी तुलना केली असता मेहकर तालुक्यात 108.68 टक्के पाऊस झाला आहे. मेहकर तालुक्यने पावसाची शंभरी पार केली असून सिं. राजा तालुका नव्वदीच्या पार आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची.  बुलडाणा : 32.7 मि.मी (602.5), चिखली : 30.8 (593.5), दे.राजा : 12.2 (556), सिं. राजा : 16.1 (745.3), लोणार : 23.7 (738.3), मेहकर : 46.2 (911.5.), खामगांव : 55.3 (565.3), शेगांव : 35.8 (376.5), मलकापूर : 19 (432.2), नांदुरा : 20.2 (445.3), मोताळा : 29.7 (461.7), संग्रामपूर : 7.5 (497.4), जळगांव जामोद : 8.3 (351.1)

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7276.6 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 559.7 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 351.1 मि.मी पावसाची नोंद जळगांव जामोद तालुक्यात झाली आहे. त्याची टक्केवारी 49.66 आहे.

जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 37.36 दलघमी (53.89), पेनटाकळी : 24.71 दलघमी (41.19), खडकपूर्णा : 78.85 दलघमी (84.45), पलढग : 3.39 दलघमी (45), ज्ञानगंगा : 25.96 दलघमी (76.53), मन : 35.37 दलघमी (96.32), कोराडी : 15.12 दलघमी (100), मस : 8.01 दलघमी (53.26), तोरणा : 4.02 दलघमी (50.95) व उतावळी : 19.79 दलघमी (100).

प्रकल्पांमधून विसर्ग सुरू

जिल्ह्यात काल रात्री व सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे. काही प्रकल्पांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मन प्रकल्पाची जलाशय पाणीपातळी 374.30 मीटर असून जीवंत पाणी साठा 96.32 टक्के आहे. प्रकल्पातून आज दुपारी 4 वाजता 3 दरवाजे 0.10 मीटरने उघडण्यात आले आहे. सद्यस्थितीत नदीपात्रात एकूण 36.00 क्युसेक  पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यावरून 05 से.मी ने 3.09 क्युसेक विसर्ग सुरू आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून 2 दरवाजे 20 से.मी उघडल्यामुळे नदीपात्रात 1456 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 

 

Exit mobile version