Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सर्वत्र ब्रम्हतत्व पाहणे म्हणजे परमार्थ -आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज

कोथळी, मुक्ताईनगर प्रतिनिधी | एकमेकांशी संवाद करताना गोड असावा. मधुर वचनाने आपण सर्वांना आपलेसे करू शकतो. सर्वत्र ब्रम्हतत्व पाहणे म्हणजे परमार्थ असल्याचे आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांनी कोथळी येथे श्रीमद् भागवत कथेच्या प्रथम दिवसाचे निरूपण करताना सांगितले.

फैजपूर येथील सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी श्री आदिशक्ती मुक्ताई यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सतपंथ परिवारातर्फे श्रीमद् भागवत कथा व कीर्तन सप्ताहाचे आयोजन श्री आदिशक्ती मुक्ताई मंदिर कोथळी येथे केले आहे. या सप्ताहाचा प्रारंभ आदिशक्ती मुक्ताईचे पूजन शशिकांत ठोंबरे व त्यांच्या पत्नी ज्योत्स्नाताई ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ग्रंथ दिंडी व दिपप्रज्वलनाने कथेची सुरुवात करण्यात आला. या वेळी श्री क्षेत्र नवगण राजुरी (बीड) येथील आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांनी श्रीमद् भागवत कथेच्या प्रथम दिवसाचे निरूपण करताना भाविकांशी संवाद साधला.

भागवत कथेचे निरुपण करताना महाराजांनी सांगितले की, हे विश्वची माझे घर… हे वचन सर्वांनी पाळले तर आपण धन्य होतो. व दिसेल ते ब्रह्म स्वरूप मानले तर आपले जीवन सुखमय होते. ज्ञान, कर्म, योग प्रक्रिया हा भक्ती प्रवाहाचा मार्ग परमेश्वर प्राप्तीचे प्रमुख मार्ग असल्याचे सांगून कथा ही भागीरथी गंगा आहे असे सांगत श्रीमद् भागवतातील नारद आणि भक्ती या युवतीचे वेगवेगळे प्रसंगवर्णन महाराजांनी केले.

या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार सतपंथ रत्न महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, आदिशक्ती मुक्ताई संस्थानचे हभप रविंद्र महाराज हरणे, हभप उद्धव महाराज, हभप नितीन महाराज, हभप दुर्गादास महाराज, हभप नरेंद्र नारखेडे, राजेंद्र मोरे, बाळू काका, प्रा. उमाकांत पाटील, राजेंद्र भारंबे यांच्यासह भक्तगणउपस्थित होते.

Exit mobile version