Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त तीन आठवड्यांचे कार्यक्रम

नवी दिल्ली वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष तब्बल तीन आठवड्यांपर्यंत सेवा व समर्पण अभियानाच्या अंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करणार असून यात रेशन किट वाटपसह अन्य उपक्रमांचा समावेश असणार आहे.

येत्या १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ७१ वर्षांचे होत आहेत. याचे औचित्य साधून यंदाचा वाढदिवस हा अतिशय जोरदार पध्दतीत साजरा करण्याचे नियोजन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आले असून याबाबत इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वर्तमानपत्राने माहिती दिली आहे. मागील वर्षी भाजपाने पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहचे आयोजन केलं होतं. तर यंदा याची व्याप्ती वाढविण्यात येणार असून याला तब्बल तीन आठवड्यांपर्यंत साजरे करण्यात येणार आहे. सेवा आणि समर्पण अभियान असं नाव देण्यात आले आहे.

भाजपाने पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसापासून अर्थात १७ सप्टेंबरपासून ते ७ ऑक्टोबरपर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. याच्या अंतर्गत नमो ऍपवरुन व्हर्चूअल प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना १४ कोटी राशनच्या किटचे वाटप करण्यात येणार. याच्या जोडीला पक्षाचे कार्यकर्ते रक्तदान शिबिरांचे आणि स्वच्छता मोहिमांचे आयोजन करणार आहेत. प्रत्येक विभागामध्ये दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव आणि आवश्यक उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमांच्या अंतर्गत देशाच्या विविध भागांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारी पाच कोटी शुभेच्छापत्र पाठवली जाणार आहेत. यात गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर खादीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येणारआहे. तर, देशभरातील ७१ ठिकाणी नद्या स्वच्छ केल्या जाणार आहेत.

याच्या जोडीलाभाजपाच्या किसान मोर्चाकडून मोदींचा वाढदिवस हा ङ्गकिसान जवान सन्मान दिवसफ म्हणून साजरा करण्याचे आदेश देण्यात आलेत. या अंतर्गत सैनिक आणि शेतकर्‍यांच्या कुटुंबियांचा सन्मान केला जाणार आहे. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून देशवासियांच्या मनात भारतीय जनता पक्षाबाबत एक सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न होणार असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version