Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मटकाझरी तलावात तीन जणांचा बुडून मृत्यू

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उमरेड तालुक्यातील कुही पोलीस ठाणे हद्दीतील एक कुटुंब, नातेवाईकांसह आंबे खाण्यासाठी एका शेतात गेले. पण झाडाला आंबे नसल्याने कुटुंबाने शेजारील मटकाझरी तलावाशेजारी डब्बा खाण्यासाठी गेले. तलावातील पाणी पाहून काहींना पोहण्याचा मोह झाला. ते तलावात उतरले पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला. जितेंद्र इस्ताराम शेंडे, संतोष किशोर बावणे, निषेध राजू पोपट असे दगावलेल्या तिघांची नावे आहेत. ज्योत्सना शेंडे, मंगला राजेश पोपट, देवांशी असे त्यांच्यासोबत शेतावर गेलेल्यांची नावे आहेत. तिघांचेही मृतदेह गुरूवारी रात्री उशिरा तलावातून बाहेर काढण्यात आले. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, या कुटुंबातील सात सदस्य कारने पाचगाव सुरगाव येथील नातेवाईकांच्या शेतात आंबे खाण्यासाठी गुरूवारी दुपारी गेले होते. येथे झाडाला आंबे नव्हते. त्यामुळे सगळ्यांनी जवळच्या मटकाझरी तलावावर डब्बा पार्टीचे नियोजन केले. प्रचंड उकाड्यामुळे जितेंद्र आणि संतोष यांनी पार्टीपूर्वी तलावात अंघोळीचा निर्णय घेतला. दोघेही तलावात उतरले. त्यांच्या पाठोपाठ निषेध हा बारा वर्षीय मुलगाही पाण्यात पोहायला आला. तिघेही खोल पाण्यात पोहत असतांना अचानक जितेंद्र बुडू लागला. संतोष व निषेध त्याला वाचवायला गेले असता तेही बुडू लागले. हा प्रकार बघून तेथे गेलेल्या कारच्या चालकाने झटपट तलावात उडी घेऊन निषेधला तलवातून बाहेर काढण्यात यश मिळवले. परंतु निषेधचा आधीच मृत्यू झाला होता. ही माहिती कळताच गावकऱ्यांसह पोलिस मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहचले. गुरूवारी रात्री उशिरापर्यत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत सगळे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.

 

Exit mobile version