Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंजाळे जवळच्या पुलावर भीषण अपघात : तीन जण गंभीर जखमी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे जवळच्या मोर नदी पुलावर सायंकाळच्या सुमारास पुनश्च चारचाकी वाहन व दुचाकी वाहनांच्या तिहेरी भीषण अपघात होवुन यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे या पुलावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

भुसावळ कडून भरधाव वेगाने येणार्‍या चारचाकी वाहनाने दोन दुचाकी वाहनास जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकी मोटरसायकलवर मागे बसलेला १३ वर्षाचा मुलगा हा नदीच्या ५० फुट उंचीच्या पुलावरून नदीपात्रात जावुन कोसळला. तर, दोन मोटरसायकल चालक असे तीन जण या अपघातात गंभीर जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे. या जखमींना भुसावळ येथे एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असुन.अपघातानंतर कार चालक हा घटनास्थळावरून पळुन गेल्याचे सांगण्यात येत आहे .

भुसावळ कडून कार क्रमांक एम. एच. १९ बी. यु. ३०८५ घेऊन अज्ञात चालक येत होता. तर यावल कडून भुसावळ कडे दुचाकी दुध विक्री करीता अरविंद प्रभाकर पाटील (वय ४५ रा. बोरावल) हे मोटरसायकलने जात होते. त्यांच्या मागे अंजाळे येथुन भुसावळ कडे पिंटू शेकोकार व त्यांचा मुलगा सोहम शेकोकार (वय १३ दोघं राहणार अंजाळे तालुका यावल ) हे भुसावळ येथे दुध विक्रीस जात होते. या दोन्ही दुचाकींना मोर नदी पुलावरून भुसावळ कडून भरधाव वेगात येणारे एमएच १९ बि.यु३०८५ या क्रमांकाच्या कारने धडक दिली. या चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत ए दुचाकीवर मागे बसलेला सोहम शेकोकार हा पुलावरून नदीपात्रात कोसळला व इतर दोन्ही दुचाकी चालकांसह बालक तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

या जखमींना तात्काळ घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने भुसावळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर कार चालक हा पसार झाला असुन,यावल पोलिसांना माहिती या अपघाताची मिळाली असुन अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगीतले. मागील महीन्यात याच मोर नदीच्या पुलावर चारचाकी व मोटरसायकलचा भिषण अपघात होवुन देऊळगाव गुजरीचा तरूण मृत्युमुखी पडला होता .दरम्यान या पुलावर वेग नियंत्रीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ गतीरोधक बसवावे अशी मागणी होत आहे.

Exit mobile version