Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

करंज येथे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्कीटमुळे तीन घरांना आग; ११ लाखांचे नुकसान

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील धानोरा खुर्द गावाजवळील करंज गावातील घरांना लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून ११ लाख रूपयांचे  नुकसान झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. महापालिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग विझविली आहे. याप्रकरणी पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धानोरा खुर्द या गावाजवळील करंज गावातील रहिवाशी सुधाकर पंढरीनाथ पाटील यांच्या बंद घरातून आज सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास आगीचा धुर निघतांना गावकऱ्यांच्या लक्षात आले. घराला कुलूप लावलेले होते. त्यावेळी घरातून मोठ्या प्रमाणावर आगीचे गोळे व धुर निघत होतो. घराच्या शेजारी राहणारे दिपक सुधाकर पाटील आणि मधुकर पंढरीनाथ पाटील यांच्या घरातूनही धुर निघत होतो. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट किंवा घरघुती गॅस गळतीमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गावकऱ्यांनी त्वरीत जळगाव महापालिकेच्या अग्निशमन बंबाला फोन करून माहिती दिली. तसेच गावकऱ्यांनी बंब येईपर्यंत आग विझविण्याचा प्रयत्न केला. 

अग्निशमन बंब येईपर्यंत तीनही घरातील संसारोपयोगी वस्तू व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. यात सुधाकर पंढरीनाथ पाटील यांच्या घरातील सदस्यांची महत्वाची कागदपत्रे असा एकुण ४ लाख रूपयांचे नुकसान झाले, दिपक सुधाकर पाटील यांचे घरातील संसारोपयोगी वस्तू आणि शासकीय कागदपत्रे जळाल्याने तीन लाख रूपयांचे नुकसान झाले तर मधुकर पंढरीनाथ पाटील यांच्या  देखील महत्वाची कागदपत्रे आणि संसारोपयोगी वस्तू जळून सुमारे चार लाख रूपयांचे नुकसान झाले. तीनही घरातील सुमारे ११ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

गावातील धानोरा खुर्द गावातील ग्रामसेवक, तलाठी सी.एस.कोळी, उपसरपंच छाया सपकाळे, पोलीस पाटील सुनिल सपकाळे यांनी घटनेचा पंचनामा केला. तर हिलाल पाटील, नारायण पाटील, अनिल सपकाळे, नारायण सोनवणे, भावलाल सपकाळे, पांडुरंग सपकाळे यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी मदत केली.

Exit mobile version