Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मारहाण करून कॅमेरा लांबविणाऱ्या तिघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । फोटो शुट करण्याचे सांगून सिध्देश कृष्णा महाजन (वय १६,रा.जोशी पेठ) या मुलाला कोल्हे हिल्स परिसरात बोलावून तिघांनी बेदम मारहाण करून ५० हजार रूपये किंमतीचा महागडा कॅमेरा लांबविल्याची घटना रविवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. मारहाण करणाऱ्या तिघांना राहत्या घरातून अटक केली आहे. तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, सिध्देश महाजन हा दहावीचे शिक्षण घेत असून फोटो शुटींगचा छंद व व्यवसाय करतो. ऑर्डरप्रमाणे फोटो काढणे व शुटींगचे काम करतो. मिळालेल्या ऑर्डर नुसार सिध्देश रविवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास कोल्हे हिल्सवर गेला. सिध्देशने त्याची दुचाकी बाजूला लावली होती. येथे अनोळखी तिघांनी सिध्देशला बेदम मारहाण करून त्यांच्याजवळील ५० हजार रूपये किंमतीचा कॅमेरा हिसकावून लंपास केला होता. याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी स्वराज संजय ठाकूर (वय-१९), अजय राजू चव्हाण (वय-२०) आणि रूपेश गणेश साळवे (वय-१८) रा. न्यु लक्ष्मी नगर सावखेडा शिवार यांना काल सोमवारी ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी अटक केली. त्यांच्याकडून चोरून नेलेला ५० हजार रूपये किंमतीचा कॅमेरा हस्तगत केला आहे. तिघांना आज मंगळवार १० ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता तिघांची कारागृहात रवानगी केली आहे. 

 ही कारवाई पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सतिश हारनोळ, पोहेकॉ अनिल फेगडे, पो.ना. सुशिल पाटील, पो.ना. ललित पाटील, पो.ना. दिनेश पाटील, पो.कॉ. दिपक कोळी, पो.कॉ प्रविण हिवराळे यांनी केली. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे. 

Exit mobile version