Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी सव्वा तीन कोटी : ना. अनिल पाटील

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांसाठी सव्वा तीन कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यात जून, २०१९ मध्ये वादळ व गारपीटीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी ३ कोटी २५ लाख ४२ हजार इतका निधी वितरीत करण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकर्‍यांना मदत व दिलासा मिळेल, असा विश्वास मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला.

जळगाव जिल्ह्यात जून, २०१९ मध्ये वादळी वारा व गारपीटीमुळे ३ हजार ८५६ बाधित शेतकर्‍यांच्या २ हजार ३९०.०८ हेक्टरवरील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बाधित शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाला होता. या प्रस्तावास मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्या नुसार बाधित शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित केल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले आहे.

Exit mobile version