Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शबरीधाम येथे निघाली हजारो आदिवासींची श्रीराम आगमन पदयात्रा- महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांचा पुढाकार

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रभू श्रीराम व माता शबरी भेटीचे भारतीय संस्कृती व सनातन धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. भक्त व भगवंत यांच्यातील अटूट विश्वास व आस्था तसेच सामाजिक समरसतेचे हे खूप मोठे प्रामाणिक उदाहरण आहे. संपूर्ण जगासाठी ही भेट कल्याणकारी क्षण आहे. अशा पवित्र शबरीधाम या ठिकाणी प्रभू रामाचे आगमन पदयात्रेचा शुभारंभ हा वारसा फाटा, पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथून फैजपूर येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांच्या सोबत हजारो आदिवासी बांधव श्रीरामाच्या जयघोषात दिनांक १३ जानेवारी रोजी पायी निघाले.

या पदयात्रेत शबरीमातेच्या कुळात जन्मलेल्या सर्व आदिवासी बांधव आपल्या पारंपारिक पोशाखात सहभागी झाले होते. या पदयात्रेत शबरी माता मंदिराचे श्री स्वामी अशीमानंदजी, शिंदखेडा येथील श्री योगी दत्तनाथजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांच्या हस्ते सरपंच परिवाराकडून उपस्थित आदिवासी बंधूंना श्रीराम, लक्ष्मण व शबरी मातेचा फोटो भेट म्हणून देण्यात आला. शबरीधाम येथे उपस्थित सर्व आदिवासी बंधू सोबत उपस्थित संत महात्मांनी भोजनाचा एकत्रित आनंद घेतला.

शबरीधाम आनंदोत्सवात धर्म जागरण प्रांत संयोजक संदीप लासुरकर, परियोजना प्रमुख डॉक्टर विकास चौधरी, धर्म जागरण विधी प्रमुख एडवोकेट कालिदास ठाकूर यांचेसह पंकज साखरे दीपक साखरे समाधान मोरे, परीक्षेत बऱ्हाटे भुसावल तसेच भिल्ल व आदिवासी समाजातील जळगाव, धुळे, नंदुरबार, डांग जिल्ह्यातील असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.

१४ जानेवारी रोजी शबरीधाम येथून महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज अयोध्येसाठी रवाना झाले. प्रभू श्रीराम जन्मभूमी पूजन सोहळ्याला जाताना महामंडलेश्वर जनार्दनजी महाराज यांनी खानदेशात असलेल्या प्रमुख तीर्थावरील माती व प्रमुख नद्यांमधील जल घेऊन प्रस्थान केले होते तर आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाताना आदिवासी बांधवांसोबत शबरीधाम येथे पायी प्रवास करत शबरी मातेचे दर्शन घेऊन प्रेमाची बोरे श्रीरामांना भेट देण्यासाठी अयोध्येला निघाले हा क्षण तेथे उपस्थित सर्वांसाठी अत्यंत अनमोल असा होता.

Exit mobile version