Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमोल शिंदे युवा प्रतिष्ठानची दहिहंडी बघण्यासाठी जनसागर लोटला

pachora dahihandi

पाचोरा, प्रतिनिधी | येथील अमोल शिंदे युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित भव्य दहिहंडी उत्सवाला मुंबईच्या २०० गोविंदा पथकांसह १३० महिलांच्या दहिकाला पथकाने हजेरी लावली. हा दहिहंडी उत्सव बघण्यासाठी शहरातील राजे संभाजी महाराज चौकात हजारोंचा जनसागर उसळला होता.

दरवर्षी भाजपा युवा नेते अमोल शिंदे हे वर्षेभर विविध सण-उत्सव व समाजोपयोगी उपक्रम वैविध्यपुर्ण पध्दतीने राबवत असतात. अमोल शिंदे युवा प्रतिष्ठानतर्फे मागील अनेक वर्षापासुन दहिहंडी उत्सव वेगवेगळया पध्दतीने राबवला जातो. त्याप्रमाणे यावर्षीही ठाणे येथील जतन गोविंदा पथकाच्या २०० गोविंदांनी सलग दोनवेळा सात थर लावुन बघणाऱ्यांच्या डोळयाचे पारणे फेडले. त्यासोबत यावर्षी विशेष म्हणजे मुंबई-गोरेगांव येथील स्वस्तिक महिला दहिकाला पथकाच्या १३० महिलांनी पाच थर लावुन चक्कर पध्दत सादर केली. हया महिला दहिकाला पथकाचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. या शिवाय वरणगाव येथील मल्लखांब असोसिएशनच्या २५ सदस्यांनी चित्त थरारक असे प्रात्यक्षिक करुन उपस्थितांचे लक्ष वेधुन घेतले. त्या सोबतच ग्लॅडीएटर डॉन्स गृप जळगांव, अरुण बॉईज गृप अमळनेर यांनीही दिलखेचक नृत्याविष्कार सादर केले. सुमारे तीन तास चाललेला हा दहीहंडी उत्सव सोहळा बघण्यासाठी तालुक्यातुन सुमारे ५० हजारांचा जनसागर उसळला होता. या प्रचंड जनसागरांत महीलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

Exit mobile version