Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आसोदा ग्रामसेवकाविरूद्ध पं.स.च्या आवारात ठिय्या आंदोलन (व्हिडीओ)

cf31e0f6 94ff 43d7 97e9 5ec407ce968c

जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद सदस्या पल्लवी देशमुख यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते रवी देशमुख यांनी आज (दि.११) पंचायत समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. ग्रामसेवक चुकीची माहिती देत असल्याने त्यांना निलंबित करावे किंवा त्याची बदली करावी, या मागणीसाठी त्यांनी पंचायत समितीच्या गेटमध्येच ठिय्या दिला.यावेळी त्यांच्यासोबत आसोदा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

जोपर्यंत आपल्या समस्यांचे निराकरण होत नाही किंवा संबंधित ग्रामसेवकावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण येथून हलणार नाही, असा पवित्रा देशमुख यांनी घेतला होता. दरम्यान, जळगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तेथे हजर झाले. गटविकास अधिकाऱ्यांसमोर देशमुख त्यांनी गाऱ्हाणे मांडले. ग्रामसेवक असोदा येथे पाण्याचे कमी टॅंकर पुरवण्यात येत असताना जादा फेऱ्या दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी हे जेवणाच्या वेळेचा बहाणा करून कार्यालयातून नेहमीच गायब असतात, असाही आरोप त्यांनी केला. तालुक्यातील चार ते पाच ग्रामसेवक इमानदारीने काम करतात उर्वरित ग्रामसेवक पुढारपण करण्यात मग्न असतात. यांच्यावर सीईओ, डेप्युटी सीईओ, अतिरिक्त सीईओ यांचा अंकुश नसल्याचेही ते म्हणाले. ग्रामीण भागातील जनता ही ग्रामसेवक व तलाठी यांच्या कार्याला कंटाळली असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय निर्णयानुसार अधिकाऱ्यांनी जेवण हे कार्यालयातच ठराविक वेळेतच घेणे अपेक्षित असताना कर्मचारी व अधिकारी हे जेवणाच्या नावाने कार्यालयाबाहेर तासंतास भटकत असतात. या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना समज देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, असोदा येथील ग्रामसेवकाची बदली करावी किंवा त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करून तसे न केल्यास येत्या आठ दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

 

Exit mobile version