Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ‘महाराष्ट्र दिन’ साधेपणाने साजरे होणार

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतूदी विचारात घेवून राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार असून सदर कार्यक्रम 1 मे, 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत अवर सचिव राजेंद्र गायकवाड यांनी याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेवून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी व या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने 15 मे, 2021 पर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. या तरतूदी विचारात घेवून राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने विविध निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा मुख्यालयात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8.00 वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात येईल. 

या ठिकाणी केवळ पालकमंत्री, महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त एवढ्याच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये. तसेच कवायती/संचलन आयोजन करण्यात येवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे. ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे, अशाही सूचनाही परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version