भुसावळात यंदा द्वारकाई व्याख्यानमाला ऑनलाइन

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील जय गणेश फाउंडेशनने द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय ऑनलाइन द्वारकाई व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक, वैचारीक उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष आहे.

पुण्याचे कवी देवा झिंजाड हे २५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता ‘कविता आई-बापाच्या’ या विषयावर प्रथम पुष्प तर सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे कवी नितीन चंदनशिवे हे २७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता ‘वेदनेचा तळ शोधणारी कविता’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफतील. यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथील गझलकार आबिद मन्सूर शेख हे २९ जुलै रोजी ‘अशी बहरली माझी गझल’ या विषयावर तृतीय पुष्प गुंफतील. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर यंदाही मर्यादा आहेत. ही बाब लक्षात घेऊन ही व्याख्यानमाला झूम मिटिंगद्वारे घेण्यात येत आहे. मनोरंजन वाहिन्यांच्या मायाजालात अडकलेल्या नव्या पिढीला वाचन, श्रवणाची गोडी लागावी, म्हणून फाउंडेशनने हा सांस्कृतिक वैचारीक उपक्रम सुरू केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून निरंतर सुरू असून यंदा सातवे वर्ष आहे. माय, माती, माणूस ही या व्याख्यानमालेची मध्यवर्ती संकल्पना असते, असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगरसेविका सुषमा नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे व पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

 

Protected Content