Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरातील नुकसानीचा ‘हा’ आहे प्राथमिक अंदाज !

जामनेर प्रतिनिधी | तालुक्यात काल रात्री झालेल्या वादळी पावसामुळे घरांची पत्रे उडाली असून शेतीची मोठी हानी झाली आहे. तर, प्रशासनाने पाहणी केल्यानंतर नुकसानीचा प्राथमिक अंदाज एका विवरणपत्राच्या माध्यमातून जाहीर केला आहे.

काल मध्यरात्रीच्या सुमारास जामनेर तालुक्यातील अनेक गावांना वादळी मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे अनेक गावांसह शेती शिवारात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. आज सकाळ पासूनच तहसीलदार अरूण शेवाळे यांनी आपल्या सहकारी कर्मचार्‍यांसह नुकसान झालेल्या गावांमध्ये पाहणी करून नुकसानीचा प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. 

या विवरणानुसार जामनेर तालुक्यातील १७ गावांमध्ये हानी झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. यात हिंगणे न.क.- सुमारे २० घरांची पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. ओखर खुर्द आणि ओझर बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये प्रत्येकी ४० घरांची पत्रे उडाली आहेत. रामपूर येथे १० तर लहासर येथे १५ घरांची पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. ढालशिंगी येथे चार घरांची अंशत: पडझड झाली असून जुनोन येथे एका घराची भिंत कोसळली आहे. तळेगाव आणि पहूर येथे अनुक्रमे ९ आणि ८ दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. टाकळी बुद्रुक येथील पेट्रोल पंपाची पत्रे उडाली आहेत. या सर्व गावांमध्ये सुमारे १३० घरांची पत्रे उडाल्याचे प्रशासनाला आढळून आले आहे.

यासोबत मेणगाव, टाकळी बुद्रुक, हिरवखेडा दिगर, देवळसगाव, वडगाव तिघ्रे, वाघारी आणि तिघ्रे वडगाव या गावांच्या शिवारातील पिकांचे वादळ आणि मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने आपल्या विवरणपत्रात नमूद केला आहे. तर शेतीची नेमकी किती हानी झाली याची माहिती या विवरण पत्रात देण्यात आलेली नाही.

 

Exit mobile version