…हा आमचा पराभव नव्हे ! : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर प्रतिक्रिया देतांना संजय राऊत यांनी भाजपने एक अतिरिक्त जागा जिंकली असली तरी हा आमचा पराभव नसल्याचे प्रतिपादन केले आहे.

राज्यसभेच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तिन्ही म्हणजे पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडीक हे उमेदवार विजयी झाले. तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना मात्र पराभवाचा धक्का बसला आहे. मविआचे चारही उमेदवार सहज विजयी होणार असल्याचे चित्र असतांना पवार यांचा पराभव अनपेक्षित मानला जात आहे. दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी याबाबत भाष्य केले.

संजय राऊत म्हणाले की, संख्याबळाचा विचार केला असता आमचे चारही उमेदवार सहज निवडून येणार असल्याची बाब दिसून येत होते. यातील पहिल्या प्राधान्याची मते ही बरोबर मिळाली असतांना दुसर्‍यात मात्र थोडी गडबड झाली. यातूनच आमची दुसरी जागा पडली. भारतीय जनता पक्षाने ही जागा जिंकली असली तरी त्यांचा विजय झाल्याचे आणी आमचा पराभव झाल्याचे म्हणता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार संजय राऊत म्हणाले की, आकड्यांच्या खेळात भाजपची सरशी झालेली असल्याचे आज दिसून येत आहे. काही जणांनी आम्हाला दुसरी मते दिली नसल्याने हे घडल्याचे त्यांनी सांगितले. तर विधानपरिषदेच्या निवडणुकीत मात्र असे घडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Protected Content