Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

….हा तर मोठाच विनोद ! : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | शरद पवार यांनी केलेल्या टिकेमुळे अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर छापे टाकण्यात आल्याचा आरोप हा मोठा विनोद असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी छापे टाकण्याचा प्रकार म्हणजे अधिकाराचा गैरवापर आहे. उत्तर प्रदेशातील हिंसाचारानंतर मी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या रागातून सत्ताधार्‍यांनी ही कारवाई केली असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी सांगितले होते. यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, काल राज्यातील विविध ठिकाणी आयकर खात्याने मारलेले छापे गेले. सहा महिने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे आहेत, असे त्या खात्याने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अशा स्थितीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या लखीमपूर खिरी प्रकरणाबाबत शरद पवार यांनी खंबीर भूमिका घेतली म्हणून छापासत्र झाले असावे, असे सांगणे हा मोठाच विनोद आहे. राज्यातील २५ निवासस्थाने आणि १५ कार्यालयांवरील छापे हे एकदोन दिवसांच्या तयारीने होऊ शकत नाही. आयकर खात्याने याबाबत बरीच तयारी केली असावी, हे या कारवाईच्या व्यापक स्वरुपावरून दिसते.

आयकर विभाग ही स्वतंत्र केंद्रीय यंत्रणा आहे. ती तिच्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीत काम करत असते. आयकर विभागाने काही आर्थिक व्यवहार उघडकीस आणले तर त्याला कायदेशीर पद्धतीनेच उत्तर दिले पाहिजे. अशा छाप्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी जोडून राजकीय रंग देणे आणि त्या आधारे स्वतःला निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न करणे हास्यास्पद आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणले.

 

Exit mobile version