Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

 कामगार राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत बुलढाणा महावितरणला सलग तिसऱ्यांदा उपविजेतेपद

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाने आयोजित केलेल्या १४ व्या राज्यस्तरीय औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाट्यस्पर्धेत येथील महावितरण कंपनीच्या नाट्य संघाने सलग तिसऱ्यांदा उपविजेतेपद प्राप्त केले आहे. एकूण ७ बक्षिसांसह महावितरणचे मनोखगोलीय वैज्ञानिक नाटक “खंडग्रास” द्वितीय ठरले आहे. सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व प्रसाद मच्छिंद्र कांबळी यांच्याहस्ते खंडग्रास टीमला बक्षिस वितरण करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्यावतीने २१ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान मुंबई विक्रोळी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात १४ व्या औद्योगिक व व्यावसायिक कामगारांसाठी राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बुलढाणा महावितरण कंपनीच्या संघाने डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित व दिग्दर्शित “खंडग्रास” हे दोन अंकी नाटक सादर केले होते. ११ मार्च रोजी जाहिर झालेल्या निकालात खंडग्रासला एकूण सात बक्षिसे मिळाली व सदर नाटक राज्यातून दुसरे आले. बक्षिसांमध्ये टीम खंडग्रासला सांघिक – द्वितीय, दिग्दर्शन – द्वितीय डॉ.चंद्रकांत शिंदे यांना, नेपथ्य द्वितीय- डॉ. गणेश राणे यांना, प्रकाशयोजना द्वितीय -डॉ. चंद्रकांत शिंदे , संगीत द्वितीय- योगेश सोनुने यांना, स्त्री अभिनय द्वितीय – सौ. ज्योती मुळे, पुरुष अभिनय तृतीय- गजानन गोराडे यांचा समावेश आहे. नाट्यसंघात कलावंत म्हणून गजानन गोराडे, सौ. ज्योती मुळे ,गणेश राणे, संतोष पाटील, विलास मानवतकर, अण्णा जाधव, वैष्णवी राऊत, वैशाली कस्तुरे, कविता वरकडे, गौतम गवई, मधुकर विघ्ने, संदीप निंबाळकर, संजय गव्हाळे, दत्तात्रय खाचणे, ऋषीश्वर चोपडे, अमित इंगळे , योगेश जाधव, योगेश सुलताने, शिवानी मोरे व संगीत सहाय्यक जगन्नाथ उबाळे यांचा समावेश होता. नाट्यसंघाचे व्यवस्थापन अभियंता विवेक वाघ यांनी केले.

मुंबई येथे १२ मार्च रोजी एका विशेष कार्यक्रमात सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रसाद मच्छिंद्र कांबळी यांच्या हस्ते टीम खंडग्रासला बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी पाताळगंगाचे महाव्यवस्थापक सोमेश्वर काळे, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, परीक्षक प्रकाश बाडकर, प्रकाश सप्रे, अंजली वळसंगकर, अविनाश कोल्हे, शिवानंद चलवादी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महावितरण बुलढाणा संघाने याआधी जननी जन्मभूमीश्च, महादेवा जातो गा या नाटकाच्या माध्यमातून सदर स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. यंदा उपविजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली आहे. नाट्य संघाला महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके, कार्यकारी अभियंता मंगरसिंग चव्हाण, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, प्रणाली विश्लेषक नितीन नांदुरकर यांनी मार्गदर्शन केले. कामगार कल्याण केंद्र बुलढाणाचे प्रमुख नंदकिशोर खत्री यांनी सहकार्य केले.

Exit mobile version