रामेश्वर कॉलनीत दुकान फोडून अडीच लाखाचे दागिने लांबविले

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्‍वर कॉलनी परिसरातील तुळजामाता नगरातील घरातच असलेले सुनंदा किराणा स्टोअर्स हे दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील एका बरणीत ठेवलेल्या सोन्या- चांदीच्या दागिण्यांसह ६० हजार रुपयांची रोकड असा २ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. 

सविस्तर माहिती अशी की, तुळजामाता नगरात सुरेश तानाजी पाटील हे पत्नी, मुलगा, सून व नातवंडे यांच्यासह वास्तव्यास आहेत. त्याच्या घरातच सुनंदा किराणा स्टोअर्सचे दुकाने असून त्यावर उदरनिर्वाह भागवितात. शनिवार, ४ सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे सुरेश पाटील यांनी दुकानातील दागिणे व रोकड व्यवस्थित असल्याची खात्री करुन दुकान बंद केले होेते. रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास सुरेश पाटील यांचा मुलगा व पत्नी दोन्ही जण दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना दुकानाचे शटर अर्धवट वाकविलेले तर कुलूपाला असलेली पट्टी तुटलेली दिसली. तसेच दुकानात पाहणी केली असता, दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. तसेच दागिणे व रोकड ठेवलेली दुकानात बरणी तसेच डबा मिळून आला नाही. बरणीतील दागिणे व डब्यातील ६० हजार रुपयांची रोकड असा चोरट्यांनी एकूण २ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन आल्याचे समोर आले.  चोरी झाल्याची खात्री झाल्यावर सुरेश पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे तसेच सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी सुरेश पाटील यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

Protected Content