Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जात घालविण्याची ‘त्यांची’ तयारी नाही : शिवसेनेची टीका

मुंबई प्रतिनिधी | जातीप्रथा संपविण्यासाठी सरकारी कार्यक्रम राबवायचे आणि त्याच वेळी एखादी व्यक्ती दलित आहे, अशी दवंडी पिटवून त्याच्या घरी भोजन मेळावा घ्यायचा हे उपक्रम राबविण्यात भाजपचा हात कोणी धरणार नाही, अशी टीका करत त्यांनाच जात घालविण्याची तयारी नसल्याचा हल्लाबोल आज शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेच मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामध्ये आज युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दलिताच्या घरी जेवण घेतल्याबाबत टीका करण्यात आली आहे. या अग्रलेखात म्हटले आहे की,  गेल्या काही वर्षांपासून भाजप पुढा़र्‍यांचा हा नवा सामाजिक परिवर्तनाचा फॉर्म्युला समोर आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी कुंभमेळयात गंगास्नान केले व नंतर काही दलितांचे पाय वगैरे धुतल्याचे नाट़फ घडवले. त्यामुळे दलित, मजूर, सफाई कामगारांचे प्रश्न उत्तर प्रदेशात तरी सुटले काय? खास दलितांच्या घरी जेवण्याचा कार्यक्रम घडवणे म्हणजे दलितांच्या बाबतीत आपली वेगळी भूमिका आहे हे स्पष्ट करण्यासारखेच आहे.

यात पुढे नमूद केले आहे की,आध्यात्मिकदृष्टया हिंदू धर्मात काही दोष आहेत. सर्वात मोठा दोष म्हणजे चातुर्वर्ण्य. चातुर्वर्ण्य पद्धतीचे समर्थन संघाच्या धुरिणांनी अनेकदा केले म्हणूनच ते दलितांना वेगळे मानून त्यांच्या घरी जेवण्याचे कार्यक्रम साग्रसंगीत करीत असतात. एकाने विद्या शिकावी, दुसऱयाने शस्त्र धरावे, तिस़रने व्यापार करावा आणि चौथ्याने हलक्या दर्जाची सेवा करावी ही व्यवस्था व्यक्तीच्या आत्मोन्नतीला मुळीच पोषक नाही. भाजपच्या पुढाऱयांना आजही दलितांकडे दलित म्हणून जेवणाचे कार्यक्रम करून त्याचा बोभाटा करावा लागतो याचा सरळ अर्थ असा की, त्यांच्या मनात जात आहे व ती जात घालवायची त्यांची तयारी नाही.

यात शेवटी म्हटले आहे की, जातीमुळे आपला देशाभिमान संकुचित झाला आहे. जातीमुळे ज्ञान, कला, शास्त्र वगैरे तेथल्या तेथे कोंडल्यासारखी झाली आहेत. जातींमुळे सर्व आचारात व विचारात मतभेद निर्माण होऊन ती परस्पर वैरास, छळास आणि मत्सरास कारण ठरली आहेत. जातींमुळे अन्न-व्यवहार-विवाह वगैरेंच्या संबंधात कितीतरी गैरसोय झाली आहे. जातीभेदांमुळे आमची भुतदया, आमचे बंधुप्रेम, आमची उदारता, आमची धर्मबुद्धी, आमची परोपकार वृत्ती, आमचे विचार यांचे क्षेत्र कितीतरी मर्यादित झाले आहे, याची कल्पना लोकांना येत नाही.फफ आगरकरांनी हे सांगून दशके लोटली, पण आज परिस्थिती काय आहे? आजही मतदारसंघांमध्ये जातीची गणिते पाहून उमेदवाऱया दिल्या जातात. जातीस महत्त्व देऊन मुख्यमंत्री, पंतप्रधान जेवणावळीचा कार्यक्रम करतात. मनातून जात जायला तयार नाही आणि निघालेत सामाजिक परिवर्तन घडवायला! अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे.

Exit mobile version