Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात आणखी बनावट मालाचे कारखाने असण्याची शक्यता

c7d389b0 9940 4030 861f 1e5fe63adf5a

 

चाळीसगाव दिलीप घोरपडे  

चाळीसगाव शहरासह तालुक्यात गेल्या काही वर्षापासून अनेक बनावट वस्तूंच्या कारखाण्यांवर पोलिस, अन्नभेसळ विभाग किंवा कॉपीराइट विभागाच्या कारवाया झाल्यामुळे चाळीसगाव जणू बनावट मालाचे माहेरघर बनण्याकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मिठासारखी सामान्य वस्तू बनावट बनविली जात असल्याचे उघड झाल्यामुळे मसाले,फरसाणसह इतर खाद्यपदार्थ देखील बनावट बनविले जात असल्याच्या भीतीने चाळीसगावकरांच्या मनात घर केले आहे.

 

मागील वर्षी औरंगाबाद बायपास जवळ बनावट दारूचा कारखाना जळगाव एलसीबीच्या पथकाने उद्ध्वस्त केला होता. यानंतर काही महिन्यातच शहरातील कोदगाव रोड व तालुक्यातील करजगाव येथे बनावट दारूचे कारखाने पोलिसांना आढळून आले होते. याठिकाणी देखील लाखो रुपयांचा बनावट देशी-विदेशी दारूचा माल पोलिसांच्या छाप्यात सापडला होता. तसेच शहरात बनावट गुटखा मोठ्या प्रमाणावर तयार करून विकला जात असल्याच्याही अनेक बातम्या रोजच सोशल मीडियावर पसरत असतात.

 

दि. 22 जुलै रोजी चाळीसगाव शहरातील बस स्थानकालगत असलेल्या शुभम प्रोव्हिजन या दुकानावर टाटा कंपनीच्या रिजनल मॅनेजर मोहम्मद हुसेन चौधरी व चाळीसगाव पोलिसांनी छापा मारून टाटा कंपनीचे बनावट मिठाच्या जवळपास चारशे गोण्या जप्त केल्या. या मालाची किंमत जवळपास चार लाखांपर्यंत आहे. जर मीठ देखील बनावट तयार करून विकले जात असेल तर, याच व्यापाऱ्यांना इतरही वस्तू बनावट तयार करून विकण्याची बुद्धी येत नसेल असे कशावरून? याचा अर्थ मिरची पावडर नावाजलेल्या कंपनीच्या नावाने असलेल्या खाण्याचे फरसाण, मुगडाळ, चणाडाळ हे देखील मिलावट करून नावाजलेल्या कंपनीच्या नावे बनावट पद्धतीने विकले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

एकंदरीत हा ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार शहरातील काही मोजके व्यापारी निश्चितच करत असावेत अशी आता चर्चा शहरभर सुरू झाली आहे. जर खरोखर तसे असेल तर उल्हासनगर नंतर बनावट माल तयार करून विकण्यामध्ये चाळीसगाव चे नाव घेतले जाईल. यात तिळमात्र मात्र शंका नाही. तेव्हा आता सर्वसामान्य ग्राहकांनी जागरूक राहून वस्तू खरेदी करताना बनावट की ओरिजनल याची खात्री करण्याची गरज आहे.

Exit mobile version