Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाना पाटेकरांविरुद्ध ‘मी-टू’ प्रकरणी पुरावेच नाहीत

Nana Tansushree 750

मुंबई (वृत्तसंस्था) कथित विनयभंगप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असा स्पष्ट उल्लेख असलेला ‘बी समरी’ अहवाल ओशिवरा पोलिसांनी कोर्टात दाखल केल्याने नाना पाटेकर यांना मोठा दिलासा लाभला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी नाना पाटेकरांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर देशभरात ‘मी-टू’ ही चळवळ सुरू झाली होती. या तक्रारीनंतर नाना पाटेकर अडचणीत आले होते.

 

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यासह, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्दिकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात १० ऑक्टोबर या दिवशी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भारतीय दंडविधान कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत या कलाकारांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळी नाना यांनी विनयभंग केला, असा जाहीर आरोप तनुश्रीने गेल्या वर्षी केला होता. तिने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती एफआयआरही नोंदवला होता. मात्र, पोलिसांकडून याप्रकरणी झालेल्या तपासात नानाविरुद्ध साक्ष देण्यासाठी कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढे आला नसल्याची चर्चा सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर, तनुश्रीने प्रसिद्धीपत्रक काढून आणि तिचे वकील अॅड. नितीन सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन नाना यांना पोलिसांनी ‘क्लीन चिट’ दिल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचा दावा केला होता. तसेच नाना यांच्या प्रसिद्धीची जबाबदारी सांभाळणाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
मात्र, आता काही दिवसांतच पोलिसांनी कोर्टाला सादर केलेल्या ‘बी समरी’ अहवालात नाना पाटेकरांविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट केल्याने नाना पाटेकरांना दिलासा मिळाला आहे. आता यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version