Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, ऐन दिवाळीत अवकाळीचं सावट

 मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  ऐण दिवाळीत राज्यातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्यानं सांगितलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मागील दोन दिवसांत मुंबईसह कोकणात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यातच आता कोकणासह मध्यमहाराष्ट्रातही वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. पुढील २४ तासात अनेक ठिकाणी जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

मुंबईत गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी  सायंकाळी अचानक झालेल्या पावसाने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच, दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहक, विक्रेत्यांचीही धावपळ झाली. मुंबईतील पश्चिम उपनगरे तसेच मध्य उपनगरात रात्री ८ नंतर अचानक पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पुढील २ दिवस मुंबईसह उपनगरात पावसाची शक्यता आहे.

मागील दोन दिवसापासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस बरसत आहे.पुढील दोन दिवसही या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात पडत असलेल्या पावसामुळे आंबा पिकांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. मागील वर्षी नोव्हेंबर आणि  डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही मागील दोन दिवसापासून होत असलेल्या पावसाने शेतकरी देखील चिंतेत आहे.

Exit mobile version