Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर विरोधात बसून जनतेची सेवा करा – संघाची स्पष्ट भूमिका

mohan bhagvat

नागपूर, वृत्तसंस्था | शिवसेनेशिवाय सरकार स्थापनेचा दावा करु नका, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार बनवणार असेल तर त्यांना सरकार स्थापन करु द्या. विरोधी पक्षात राहून जनतेची सेवा करण्यासाठी तयार राहा. असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

 

फडणवीस आणि गडकरी यांनी मंगळवारी रात्री येथील संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या घडामोडींशी संबंधित असलेल्या जवळच्या सूत्राच्या हवाल्याने हे वृत्त कळले आहे. घोडेबाजाराच्या घाणेरडया राजकारणात पडू नका. दीर्घकाळाचा विचार करता भाजपासाठी ते हिताचे राहणार नाही, असे भागवत यांनी फडणवीस यांना सांगितले.

शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सोमवारी मोहन भागवत यांना पत्र लिहून शिवसेना-भाजपामध्ये सुरु असलेल्या संघर्षात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. शिवसेनेशिवाय सरकार स्थापनेचा दावा करणार नाही, असेही भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. २०१४ ची परिस्थिती वेगळी होती. आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढलो होतो. यावेळी आम्ही भाजपा-शिवसेना युतीसाठी जनतेकडे मते मागितली होती असे या नेत्याने सांगितले.

Exit mobile version