… तर लोक मोदींच्या फोटोला शेण लावतील- माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । पेट्रोल पंपावर उज्ज्वला गॅस योजना आणि सरकारच्या धोरणांची जाहिरात करणाऱ्या पेट्रोलपंपांवरील फलकावर पंतप्रधान मोदींचे फोटो आहे. आताच इंधन दरवाढीमुळे लोक या फोटोकडे तिरस्काराने पाहतात. लवकर ही दरवाढ कमी झाली नाही तर लोक मोदींच्या फोटोंना शेण लावतील असा संताप आज माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हा काँग्रेसने आज शहरात काढलेल्या गॅस व इंधन दरवाढीच्या विरोधातील सायकल फेरी आंदोलनात सहभागी झालेले माजी खासदार डॉ उल्हास पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारची महागाई नियंत्रणात ठेवण्याची घोषणा आता विश्वासघाताची ठरली आहे. लोकांनी मोठ्या आशेने ज्या महत्वाच्या मुद्द्यांवर जे सरकार निवडून दिले. त्यात महागाईचा मुद्दा अत्यंत महत्वाचा होता. मात्र सध्या नेमकी उलटी परिस्थिती या सरकारमुळेच आली आहे. या मुद्द्यावर लोकांना जागृत करण्यासाठी आता कॉग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. महागाईच्या विरोधात सातत्याने काँग्रेसची आंदोलने सुरू राहतील या आंदोलनांमध्ये दिवसेंदिवस लोकसहभाग वाढवा ही आम्हाला अपेक्षा आहे. आजची आमची सायकल फेरी १० किलोमीटर अंतराची होती. पुढच्या काळात आंदोलनाची व्याप्ती वाढलेली दिसेल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील, प्रदेशउपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी व महानगराध्यक्ष श्याम तायडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आंदोलन तिव्र केले जाणार आहे. असेही ते म्हणाले.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, इंधन दरवाढीमुळे सर्वत्र महागाई वाढते आहे. उत्पादन प्रक्रिया व वाहतूकीसाठी ज्या ज्या कामात पेट्रोल डिझेल आणि गॅसचा वापर होतो. ती सगळी उत्पादने प्रचंड महागली आहेत. त्यामुळे काँग्रेसचे हे आंदोलन पुढच्या काळात लोक आंदोलन बनावे असे आमचे प्रयत्‍न राहणार आहे. मोदी सरकारच्या धोरणाला सगळेच वैतागले आहेत असेही ते म्हणाले.

Protected Content