Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन ट्रकांच्या कॅबिनमध्ये चोरी; २३ हजाराचा ऐवज लांबविला

जळगाव प्रतिनिधी । जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर पार्किंगला असलेल्या दोन ट्रकमधून चालकांचे २३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मालट्रक क्रमांक (एम एच ०४ एफपी ३०१९) आणि (एमएच 19 झेड ३५९९) हे दोन ट्रक १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता पार्किंग करून लावले होते. अज्ञात चोरट्यांनी दोन्ही ट्रकच्या केबिन मधून २१ हजार ६०८ रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि २ हजार रुपयांची रोकड असा एकूण २३ हजार ६०८ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे बुधवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी जालीदर शहादवे आंधळे (वय-२८) रा. आंधळे वस्ती ता. आष्टी जि. बीड आणि प्रवीण अरुण पाटील रा. अंजाळे ता. यावल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक मुद्दसर काझी करीत आहे.

Exit mobile version