किनगावात भर दिवसा चोरी; भामट्यांचे कृत्य सीसीटिव्हीत कैद !

यावल, अय्यूब पटेल | तालुक्यातील किनगाव येथील भुसार मालाच्या व्यापार्‍याच्या दुकानातून अगदी भर दिवसा सर्वांच्या समोरून चाळीस हजार रूपयांची थैली लांबविल्याचा प्रकार आज घडला आहे. सर्वांसमोर भामटेगिरी करणार्‍यांचे कृत्य परिसरातील सीसीटिव्हींमध्ये कैद झाले असून या अनुषंगाने आता पोलिसांचा तपास सुरू आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील किनगाव येथे नरेंद्र आबाजी पाटील यांच्या मालकीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाच्या परिसरात साई ट्रेडर्स हे भुसार मालाचे दुकान आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास दोन चोरटे त्यांच्या दुकानासमोर आले. त्यांनी तेथे थोडा वेळ उभे राहून आणि बसून टेहळणी केली. यानंतर यातील एका चोरण्याने अगदी क्षणार्धात त्यांनी बाहेर ठेवलेली पिशवी उचलून पोबारा केला. यानंतर त्याचा साथीदारही तेथून गायब झाला. या थैलीमध्ये सुमारे ४० हजार रूपये असल्याची माहिती दुकानदारांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली. तर, अवघ्या काही क्षणांमधील हा संपर्ण थरार परिसरातील सीसीटिव्हीत कैद झाला आहे.

या सीसीटिव्हीच्या फुटेजनुसार दोन्ही चोरटे हे नवतरूण दिसून येत आहेत. ते अगदी सराईतपणे फिरतांना आढळून आले आहेत. तर सीसीटिव्हीमध्ये त्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसून आल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोलीस लवकरच पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चोरीची माहिती मिळताच यावल पोलीस स्थानकाचे उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Protected Content