Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नोकरीच्या आमिषाने तरुणीला अडीच लाखांचा गंडा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नोकरीचे आमिष दाखवत जळगाव शहरातील टागोर नगर येथील तरुणीची 2 लाख 60 हजार रुपयात फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे . याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील टागोर नगरातील रवीना बावणे ही तरूणी वास्तव्यास आहे. २६ मे रोजी रवीना ही गुगलवर जॉब शोधण्यासाठी व्हॅकन्सी शोधत होती. यावेळी इंडिया जॉब पोर्टलवर नर्सिंग पोस्टसाठी तिला व्हॅकन्सी दिसून आली. त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तिने संपर्क साधून नोकरी बद्दल विचारपूस केली. फोनवरील महिलेने संबंधित व्हॅकन्सीची माहिती दिल्यानंतर कागदपत्रांची मागणी केली आणि नोकरीसाठी सुमारे ३ लाख रूपयांचा खर्च येईल असे देखील सांगितले. त्यानंतर महिलेने रवीना हिचे विश्वास संपादन करून तिच्याकडून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकूण २ लाख ६० हजार रूपये उकळले.

 

तरुणीने पैसे भरल्यानंतर काही दिवसांनंतर तरुणीला जॉब लेटर सुध्दा मिळाले. पण, नोकरी मिळाली नाही. अखेर रवीना हिने १३ जून रोजी संबंधित महिलेला फोन केला आणि पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र, पैसे परत न मिळाल्यामुळे अखेर तरूणीने गुरूवारी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार हे करीत आहेत.

Exit mobile version