Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरुण शेतमजुराला खेचले मृत्यूच्या दाढेबाहेर

जळगाव प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील तरुण शेतमजुराने नैराश्यातून विषप्राशन करीत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. अत्यंत गंभीर अवस्थेत त्याला जळगाव शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यावर वैद्यकीय पथकाने २० दिवस अतिदक्षता विभागात ठेऊन उपचार करत त्याचे प्राण वाचविले.

पाचोरा तालुक्यातील रहिवासी तरुण शेतमजुराने नैराश्यातून विषप्राशन करीत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. अत्यंत गंभीर अवस्थेत त्याला पाचोरा येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या जगण्याची शक्यता मावळली होतीच, मात्र वैद्यकीय पथकाने हार न मानता त्याला २० दिवस अतिदक्षता विभागात ठेऊन त्याचे प्राण वाचविले. मंगळवारी दि. १८ जानेवारी रोजी त्याला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

मूळचा वठाण ता. सोयगाव येथील रहिवासी असलेला आणि पाचोरा तालुक्यातील रहिवासी चेतन (वय २३, नाव बदलले आहे) याने नैराश्यातून शेतात घातक विषारी औषध प्राशन केले होते. त्याच्या कुटुंबियांना तो रेल्वेरुळाजवळ मिळून आला होता. तत्काळ पाचोरा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती धोक्यादायक झाल्याने तेथील डॉक्टरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दि.२४ डिसेंबर रोजी चेतनला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची त्यावेळी प्रकृती पाहता, त्याच्या हृदयाचे ठोके लागत नव्हते. शरीरात विष पूर्णपणे पसरून गेलेले होते. अशा गंभीर रुग्णाची प्रकृती खालावलेली होती. मात्र वैद्यकीय पथकाने जिद्द ठेऊन त्याला अतिदक्षता विभागात प्राणरक्षक व्हेंटिलेटर लावून १५ दिवस सातत्याने उपचार केले. अखेर सोळाव्या दिवशी काहीशी सुधारणा झाली. २१ व्या दिवशी त्याला प्रकृती साधारण झाल्यावर जनरल कक्ष क्र. ९ येथे डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले.

त्याच्या बोलण्यावर काहीसा परिणाम झाला असून इतर प्रकृती चांगली झाली आहे. चेतनला मंगळवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक तथा औषध वैद्यक शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक विजय गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगिता बावस्कर आदी उपस्थित होते.

उपचार करण्याकामी छातीविकार विभागाचे डॉ. स्वप्निल चौधरी, डॉ. भूषण पाटील, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. गजानन परखड, डॉ.प्रसाद खैरनार, डॉ. ऋषिकेश येऊळ, डॉ. सुबोध महल्ले, डॉ.विशाल आंबेकर, डॉ.संदीप बोरसे, डॉ. आस्था गणेरीवाल, डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा चौधरी यांच्यासह अधिसेविका प्रणिता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १४ नंबर आयसीयू इन्चार्ज माया सोळंकी, ९ नंबर कक्ष परिचारिका इन्चार्ज तुषार पाटील यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version