परिचारिकांचे कार्य अत्यंत मोलाचे – डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे प्रतिपादन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये ‘जागतिक परिचारिका दिना’निमित्त कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी ‘परिचारिकांचे कार्य अत्यंत मोलाचे’ असल्याचं प्रतिपादन डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केलं.

“शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये परिचारिकांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना काळामध्ये परिचारिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी पूर्णवेळ कार्य केले. आजही कोरोना विरहित काळामध्ये परिचारिका रुग्णसेवेचे निस्वार्थपणे काम करीत आहेत.” असं प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केलं.

यापुढे बोलतांना, “कोरोना काळामध्ये परिचारिकांनी रुग्णांसाठी अत्यंत मोलाचे कार्य केले. रुग्णसेवेमध्ये प्रत्येक कक्षामध्ये परिचारिका हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. रुग्णांशी आपुलकीने संवाद साधणे, त्यांच्यावर उपचाराप्रसंगी लक्ष ठेवणे तसेच वैद्यकीय सेवेची प्रतिमा उजळवणे असे महत्त्वाचे कार्य परिचारिका करीत असतात, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मंचावर प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्‍कर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल महाजन, डॉ. मिलिंद चौधरी,  अधिसेविका प्रणिता गायकवाड, सहायक अधिसेविका उपस्थित होते.

सुरुवातीला दीपप्रज्वलन करून फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यानंतर जागतिक परिचारिका दिनानिमित्त अधीसेविका प्रणिता गायकवाड यांनी माहिती दिली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content