Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

येणारा श्री गणेश उत्सव सकारात्मकदृष्टया साजरा होणं गरजेचं – चंदकांत गवळी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “देशाची युवा पीढी उर्जास्रोत आहे. आगामी काळात येणारा गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा.” असे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी आज यावल येथे संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले.

आगामी काळात येणारे पोळा, व गणेश उत्सवाचे निमित्ताने येथे धनश्री मंगल कार्यालयाच्या सभागृहात पोलिस ठाण्यामार्फत आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचेसह फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, वीज वितरणचे सहाय्यक अभियंता महेश वावरे, पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर,सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, उपनिरीक्षक सुदाम काकडे, नगर पालिकेचे स्थापत्य अभियंता योगेश मदने हे उपस्थित होते.

बैठकीचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केले. प्रसंगी शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, शांतता समिती सदस्य पुंडलीक बारी, भगतसिंग पाटील यांची भाषणे झाली. अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी याप्रसंगी उपस्थितांशी संवाद म्हणाले की, “लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याचा उद्देश महान होता. ब्रिटीश काळात विखुरलेला समाज एकत्र एकजुट करण्यासाठी त्यांनी या श्रीगणेश उत्सवास सार्वजनिक रूप दिले. आज साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव सकारात्मकदृष्टया साजरा होणे गरजेचे आहे.” असे त्यानी सांगितले.

बैठकीस माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांक देशपांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले, भाजपाचे शहर अध्यक्ष निलेश गडे, राजू करांडे, माजी नगरसेवक इकबाल खाँ नसीर खाँ, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, भाजपाचे गोपाळसिंग कॉंग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष गफ्फार शाह, माजी प्राचार्य रहीम रजा यांच्यासह तालुक्यातील विविध ठिकाणचे पोलीस पाटील , सरपंच गणेश मंडळाचे पदाधिकारी आदी या बैठकीस मोठया संख्येत उपस्थित होते. या शांतता समिती बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केले.

Exit mobile version