Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेकडून चक्क राज्य सरकारचे कौतुक

shivsena

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना-भाजपा युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र सामनातील अग्रलेखाची धारही बोथट झाल्याचं पाहायला मिळत आहे. एरवी, म्हणजेच युती होण्यापूर्वी भाजपा, मोदी आणि अमित शहांच्या टीकेने दिवसाची सुरूवात करणाऱ्या जहाल शिवसेनेची भूमिका आता मवाळ झाल्याचं दिसत आहे. कारण, आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपाचे भरभरून कौतुक केल्याचं दिसत आहे.

राज्याचे नवीन उद्योग धोरण सरकारने मंगळवारी जाहीर केले आणि त्याचवेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल २२ निर्णय घेण्यात आले. जनहिताचे हे निर्णय असोत किंवा राज्यातील रोजगाराच्या संधी वाढविणारे ‘उद्योग धोरण’, त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे ? विद्यापीठे, महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा, ही मागणी होतीच. तिची पूर्तता सरकारने केली आहे. त्याचा लाभ राज्यातील हजारो शिक्षक-शिक्षकेतर कुटुंबांना मिळणार आहे. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे, ही मागणीदेखील जुनीच आहे. लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आग्रह शिवसेनेनेच धरला होता. त्यामुळे हेही काम मार्गी लागण्यात शिवसेनेचा वाटा असल्याचं सांगण्याला शिवसेना विसरली नाही. यावरून, नेहमीच भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका करणारी अन् शेतकरी, पीडित अन् जनतेचे प्रश्न मांडणारी शिवसेना, आता चक्क सरकारचं कौतुक करताना दिसत आहे. राज्यात तब्बल १० लाख कोटींची गुंतवणूक होत असून सुमारे ४० लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित तसेच रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना चालना दिली जाणार आहे. १८ ते ४५ वयोगटातील पात्र लोकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण दिले जाईल. मात्र, यामुळे विरोधकांना ‘ब्रेक’ लागणार आहे, असे म्हणत शिवसेनेकडून आता सत्ताधाऱ्यांचे कौतुक करण्याचं काम सुरू झालं आहे.

Exit mobile version