चौथ्या लाटेचे संकेत ? राज्यात संसर्गबाधित रुग्णसंख्येत वाढ,

मुंबई/ जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात संसर्गाच्या चौथ्या लाटेचे संकेत असून  तब्बल दोन वर्ष सात दिवसानंतर म्हणजेच ३ एप्रिल २०२२ रोजी संसर्गमुक्त झालेल्या जळगाव जिल्ह्यात ११ मे रोजी एक संसर्गबाधित रुग्ण आढळला असून त्याच्यावर घरीच उपचार केले जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

तर दुसरीकडे राज्यात नव्याने आढळणाऱ्या संसर्गबाधित रुग्णसंख्येत गत सप्ताहापासून सुमारे ३२ टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत असून पुणे, ठाणेसह नगर जिल्ह्यांत देखील रुग्णांचा समावेश आहे.

गेल्या सप्ताहात आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी चौथी लाट येण्याचे संकेत दिले होते, गेल्या आठवडय़ापासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आठवडाभरातच नव्या संसर्गबाधित रुग्णांच्या संख्येत सुमारे ३२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. सर्वाधिक ८६० उपचाराधीन रुग्ण मुंबईत असून त्या खालोखाल पुणे, ठाणे या शहरातील रुग्णाचा समावेश आहे.
राज्यात फेब्रुवारी पूर्वीच बुलढाणा जिल्हा संसर्गमुक्त झाला होता. त्याच बुलढाणा जिल्ह्यात सध्या सर्वाधिक सुमारे २.२३ टक्के बाधितांचे प्रमाण असून त्या खालोखाल औरंगाबाद २.१२, मुंबई १.७९, पुण्यात १.६५ तर नांदेडमध्ये एक टक्का आहे. पाच जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण एक टक्क्याखाली आहे.

जिल्ह्यात सरासरी ८० टक्के लसीकरण पूर्ण
जळगाव जिल्ह्यात आतापर्यत ३६ लाखांहून अधिक लसीकरण पात्र असलेल्या नागरीकापैकी सुमारे ९४ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर ८४ टक्के नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. तर १५ ते १७ वर्ष वयोगटातील किशोरवयीन विध्यार्थ्यांचे देखील पहिल्या टप्यातील लसीकरण ७० ते ७५ टक्क्याच्या जवळपास पूर्ण करण्यात आले आहे. १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे देखील लसीकरण केले जात असले तरी त्यांचा प्रतिसाद मात्र काही प्रमाणात कमी असल्याचे दिसून आले आहे असे वैद्यकीय सूत्रांनी म्हटले आहे.

लसीकरण हाच उपाय
रुग्णसंख्या वाढ नगण्य असली तरी नागरिकांनी दुर्लक्ष करू नये. संसर्ग नियमांचे पालन करीत जेथे आवश्यकतेच्या ठिकाणी मास्क वापर करणे आवश्यक आहे. तसेच संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण हाच खात्रीलायक उपाय असून ज्या नागरिकांचे अजूनही लसीकरण झालेले नाही किंवा ज्यांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण झाले आहे व दुसऱ्या टप्प्यातील लस घेतलेली नाही त्यांनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात संसर्ग प्रतिबंधात्मकलसीचा साठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध आहे. शिवाय जिल्ह्यातील नागरिकांनी संसर्ग प्रतिबंधात्मक लसीचे यापूर्वी जे दोन डोस घेतले असतील आणि दुसरा डोस घेऊन ९ महिने कालावधी पूर्ण झाला असेल तर त्याच लसीचा बुस्टर डोस घ्यावा.
अभिजित राऊत,                                                                                      जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती प्राधिकरण समिती अध्यक्ष.

Protected Content