Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुलाबी चेंडू म्हणजे भारत-पाक सामना – कोहली

Virat kohli

 

कोलकाता वृत्तसंस्था । भारतातील पहिला दिवसरात्र कसोटी सामना उद्या कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. त्या आधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डे-नाईट कसोटी सामन्यातील गुलाबी चेंडूची तुलना भारतविरुद्ध पाकिस्तान सामन्याशी केली आहे. कोहली म्हणाला, ‘गुलाबी बॉल खेळणे आव्हानात्मक’ असून ‘वर्ल्ड कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याइतकेच ते रोमांचक असणार आहे.

या ऐतिहासिक सामन्याची उत्सुकता एव्हाना शिगेला पोहोचली आहे. कसोटीच्या पहिल्या चार दिवसांची तिकीटे संपली आहेत. मात्र, ही कसोटी गुलाबी चेंडूसह होत असल्यानं क्रिकेटपटू सावध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. विराटची प्रतिक्रिया देखील काहीशी अशीच आहे. ‘गुलाबी चेंडूनं खेळणं कठीण असेल. गोलंदाजी कशी होतेय. फलंदाज चेंडूचा सामना कसा करतात हे पाहावं लागेल. सवय झाल्यानंतर खेळणं कदाचित सोपं जाईल,’ असं तो म्हणाला.

कोलकाता कसोटीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची चिन्हं आहेत. त्या विषयी विराटनं आनंद व्यक्त केला. ‘गुलाबी चेंडूविषयी लोकांना उत्सुकता आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी असं व्हायचं. तेव्हा दिग्गज क्रिकेटपटू मैदानात असायचे. सगळीकडं याच सामन्याची चर्चा व्हायची. आताही तसंच वातावरण आहे,’ असं तो म्हणाला.

Exit mobile version