Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवपुतळ्याच्या मार्गातील अडथळा आमदार उन्मेश पाटील यांच्या पाठपुराव्याने मोकळा

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नियोजित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा व प्रस्तावित शिवसृष्टीसाठी रस्ता अवर्गीकृत असल्याची अडचण आमदार उन्मेश पाटील यांच्या भक्कम पाठपुराव्यामुळे दूर झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याच्या नियोजीत जागेजवळून जाणार्‍या नगरपालिका हद्दीतील सोलापूर–औरंगाबाद–धुळे रस्ता (राष्ट्रीय महामार्ग क्र. 211) अंतर्गत सिग्नल पॉइंट ते मालेगाव नाका पर्यंतचा रस्ता अवर्गीकृत करण्यास सोमवारी ( 11 फेब्रुवारी) शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुतळा व शिवसृष्टी उभारण्यातील अडथळा दूर झाला आहे.

जागेचे यापूर्वीच हस्तांतरण-

नियोजित पुतळा असलेल्या सिग्नल पॉइंट परिसरातील सर्वे क्र.51 मधील त्रिकोणाकृती 680 चौरस मीटर जागा ही याआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महसूल विभाग व महसूल विभागाकडून नगरपालिकेला आमदार उन्मेश पाटील यांच्या पाठपुराव्याने हस्तांतरण करण्यात आली आहे. तसेच नगरपालिकेमार्फत देखील शिवपुतळ्याची टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र सदर जागेजवळून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने शासनाच्या नियमानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या 100 मीटर अंतरात कोणतेही स्मारक व बांधकाम करता येत नव्हते. ही जागा राष्ट्रीय महामार्गाकडून अवर्गीकृत व्हावी, अशी मागणी बर्‍याच वर्षांपासून होती, मात्र योग्य पाठपुरावा न झाल्यामुळे बरीच वर्ष हा प्रश्न रेंगाळत होता. आमदार उन्मेश पाटील यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सदर रस्ता अवर्गीकृत व्हावा, म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. तालुका पातळीवरून ते मंत्रालय स्तरावर सदर कागदपत्रांची फाईल वैयक्तिक लक्ष घालून वेळोवेळी पुढे केली. त्यानुसार चाळीसगाव नगरपरिषद हद्दीतील सोलापूर–औरंगाबाद–धुळे रस्ता (राष्ट्रीय महामार्ग क्र.211 ) या रस्त्याची चाळीसगाव नगरपरिषद हद्दीतील साखळी क्र.397/800 ते 401/00 (3.20 कि.मी.) लांबी अवर्गीकृत करण्यात आली आहे. ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल आमदार उन्मेश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे तालुकावासियांच्या वतीने आभार मानले आहेत. ही अडचण दूर झाल्याने तालुक्यातील शिवप्रेमी जनतेमध्ये आनंदाला उधाण आले असूही या शिवजयंती तालुकाभरात जल्लोषात साजरी होईल, असे चित्र आहे.

Exit mobile version