Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘१००’ क्रमांक कायमचा इतिहासजमा होणार

मुंबई । एखाद्या आपत्कालीन प्रसंगी पोलिसांना संपर्क करायचा झाल्यास १०० हा नंबर वापरण्यात येतो. पण लवकरच हा क्रमांक कायमचा इतिहासजमा होणार आहे. त्याऐवजी ‘११२’ हा नवीन व एकच क्रमांक आपत्कालीन प्रसंगी पीडितांच्या सर्व प्रकारच्या मदतीला उपलब्ध होणार आहे.     

देशभरातील 20 राज्यांमध्ये १०० नंबर पोलिसांशी संपर्कासाठी वापरण्यात येतो. त्यात महाराष्ट्र व गुजरात या राज्यांचा देखील समावेश होतो. राज्यात पोलीस १००, अग्निशामक दल १०१ व महिला हेल्पलाईनसाठी १०९० हे क्रमांक वापरण्यात येत होते. परंतु, लवकरच हे क्रमांक कायमस्वरूपी बंद होणार आहे. त्याऐवजी ११२ हा एकच क्रमांक उपलब्ध असणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ११२ हा हेल्पलाईन क्रमांक म्हणून राज्यात अस्तित्वात येणार आहे. देशातील २० राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी ११२ हा हेल्पलाईन क्रमांक स्वीकारला आहे.  

 ‘११२’ या एकाच क्रमांकाद्वारे सर्व प्रकारची मदत संकटात सापडलेल्या व्यक्तीला मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.  या वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यामध्ये ११२ हा हेल्पलाईन क्रमांक म्हणून अस्तित्वात आणला जावा यादृष्टीने तयारी सुरू आहे. आपत्कालीन प्रसंगी जर कुणी ११२ क्रमांकावरून संपर्क साधल्यास तात्काळ आणि एकाच वेळी पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशामक दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना संबंधित क्रमांकाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 

 

 

 

Exit mobile version